Thursday 17 July 2008

पाँडीचेरी भेट - विदुषी आजी

ऑक्टोबर २००३ चा महिना माझ्यासाठी खूपच संस्मरणीय ठरला. माझी आजी ही पाँडीचेरीच्या श्री ओरोबिंदो आश्रमाची अनुयायी आहे ... केवळ तिने आग्रह धरला म्हणून मी पाँडीचेरीला गेले. प्रथम पुट्टपर्थी आणि नंतर मजल दरमजल करत पाँडीचेरीचा प्रवास ...
त्या ७-८ दिवसात मी जे काही पाहिलं आणि अनुभवलं ते खरोखरं अभुतपूर्वच होतं त्या प्रवासाची यादगार रोजनिशी इथे लिहीते आहे. पूर्ण प्रवासाचे प्रेरणास्थान असलेल्या माझ्या आजीबद्दल थोडेसे आधी लिहीते आहे अन मग प्रवासाला सुरुवात करते ...

जायचं जायचं म्हणत प्रचंड इच्छाशक्तीनं किंबहुना फक्त त्याच बळावर आजी पाँडीचेरीला पोचली देखील. कळत असल्यापासून कळत नकळत का असेना पण आजीच्या अतिशय उमद्या मनाचा आणि आमच्या भाषेत एकदम 'सॉलीड' इच्छाशक्तीचा प्रत्यय मी घेतेय. 'आम्ही काय पिकली पानं! कधी गळून पडू नेम नाही' किंवा 'आता तुमचं ते अमकंतमकं झालं नं की मी वर जायला मोकळी' अशी फक्त आपलं स्वत:चच नव्हे तर दुसरर्‍याचंही मानसिक खच्चीकरण करणारी भाषा आजीच्या तोंडून मी कधीही एकल्याचं स्मरत नाही. उलट 'हे नाहीये ... आता माझं सगळं संपलंच' अशी निर्वाणीची भाषा बोलणार्‍या आम्हा तरूण मनांना तिचे शब्द उभारी देतात. कोट्याधीश नसले तरी गडगंज संपत्ती असणार्‍या शारंगपाणींकडची ही मुलगी. इनामदार घराणं मोठं श्रीमंत. आणि त्याही काळात मुलगा / मुलगीमध्ये शिक्षणाच्या अंगानं बिलकुल भेदभाव नसणारं. लहानपणीच आईचा वियोग झालेला असल्यानं आजी मनानं काहीशी प्रौढ बनत गेली. त्यातून दोन बहिणींतली मोठी मुलगी असल्यानं जबाबदारींच भान येणं, पुढे सावत्र आईचा जाच सहन करावा लागणं, नी धाकट्या बहिणीसाठी स्वतःची सुखं, स्वतःच्या भावना दडपणं हे ओघानं होत गेले.

पण वडिलांनी पहिली लेक आणि त्यातून आज्ञाधारकतेचं लेणं ल्यालेली म्हणून खूप शिकवलं नव्हे सारं काही स्वतःच जे शिकणं बाकी होतं, ज्या सुप्त इच्छा होत्या त्या पुर्‍या करून घेतल्या. बडोद्यात जन्मल्यानं गुजराथी बोलीभाषेशी संबंध आला. महाराष्ट्रीयन घरातलं शुध्द सरळसोट कोकणस्थी वळणाचं मराठी, वडिलांच्या आग्रहयुक्त सक्तीखातर पूर्ण दहावीपर्यंतचा बंगालीचा अभ्यास एक दीड वर्षात संपवल्यानं बंगालीतलं नैपुण्य आणि त्याही काळात एम.ए. पर्यंत संस्कृतमध्ये शिकल्यानं येणारं संस्कृत, शिवायं बी.ए. पर्यंत वाघिणीचं दूध प्यालेलं. म्हणजे आजच्या घडीला या बाईचं मराठी, संस्कृत, इंग्रजी, बंगाली आणि गुजराथी कुशलं असणं नी अधूनमधून 'हिंदी तेवढं राहीलं' अशी चुटपुट व्यक्त करणं. काय म्हणावं या अजब, दुर्दम्य आणि मिश्र शिक्षण असणार्‍या विदुषीला ? आणि एक गमतीची बाब म्हणजे इतकी लेणी मिरवणार्‍या या आजीचं लग्न एका कानडी विठ्ठलाशी व्हावं हा एक गमतीचा योगायोग!
पुढे यथावकाश पाँडीचेरीच्या श्री माताजींचा संबंध येणं, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणं, त्यांच्याशी तद्रूप होण्याचा प्रयत्न असणं हे हिचं केवळ अलौकिक पूर्वसुकृत!

आज वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत आजी स्वयंपाकघरात सर्वांसाठी राबत असे. आईच्या वात्सल्यानं झटतं असे. पण मध्ये आलेल्या आजारपणानं तिचा हा मक्ता, तिची कर्मभूमी माझ्या आईच्या स्वाधीन केला, अन आजीनं किचनमधून V.R.S. घेतली, हो voluntary च कारण नाहीतर तिचे अव्याहतपणे काम सुरुंच राहीले असते ....

क्रमशः

प्रिया

Tuesday 15 July 2008

प्रवास आयुष्याचा

मला वाटतं की आयुष्यात माणसानं कायम पुढं चालत रहावं. काळासोबत स्वतःला घेऊन जावं. बर्‍याचदा काळाचा प्रवास आणि आपला प्रवास यांचं गणित कुठेतरी चुकतं जातं, त्यात विसंगती पडत जाते आणि कसल्यातरी अडनिड्या तिढ्यातच आपण आयुष्य जगत राहतो. म्हणून युगानुयुगं चालत आलेली आयुष्यासाठीची 'प्रवास' ही उपमा अतिशय समर्पक आहे. आपण पुर्‍या तयारीनिशी प्रवासाला निघतो. बरीचशी ठिकाण 'कव्हर' करावा असं डोक्यात असतं. पण खूपदा दोन ठिकाणांच्या मध्ये भेटणारी ठिकाणंच जास्त हवीहवीशी, विसाव्याची आणि थांबावीशी वाटायला लागतात. तिथलं सौंदर्य मनाला लुभावून टाकतं. पण म्हणून काय आपण आपलं सगळं सामान तिथंच पसरून तिथं वस्तीला राहात नाही, किंबहुना राहू शकत नाही, 'अजून बराच पल्ला गाठायचाय. दरम्यान एखादं सुंदर ठिकाण जरी लागलं, तरी कायमस्वरुपी विश्रांतीचं काही ते होऊ शकत नाही ... ' या भावनेनं का असेना, पण बळंबळंच आपल्याला त्या ठिकाणी पसरलेला पसारा आवरता घ्यावा लागतो नी पुढच्या प्रवासासाठी निघावंच लागतं.

हां पण एक गोष्ट खरी असते - दोन महत्त्वाच्या ठिकाणांमधली - अधलीमधली ही विसाव्याची ठिकाणंच, पुढच्या लाबं खडतर पल्ल्यासाठी आवश्यक ते बळ पुरवत रहातात. तो विसावा, तो गारवा, तिथला आनंद एकदा जवळ साठवून ठेवला की मग पुढच्या प्रवासासाठीचा रस्ता खूपसा सुकर होतो...

अगदी अस्सचं आयुष्याच्या बाबतीत वागता येईल? ती मधली विसाव्याची ठिकाणं म्हणजे माणसं मानली तर जितक्या निर्लेप मनानं आपण पुढच्या प्रवासाला जातो. तितक्याच निर्लेप मनानं आपण त्यांच्यापासून दूर होऊन पुढच्या आयुष्याकडं 'काही घडलचं नाही' या तटस्थ भावनेनं पाहु शकु?

प्रिया
Reader is the inspiration for writing...

Sunday 6 July 2008

अरुणा ढेरेंशी भेट

नोव्हेंबर २००६
पुणे
खूपशी निवांत वेळ

गेले चार आठ दिवस एका वेगळ्याच धुंदीत वावरत होते मी. जेव्हापासून भाईंनी सांगितलं 'एक पार्सल तुला अरुणा ढेरेंना द्यायचंय' तेव्हापासून वरवर शांत पण आतून अस्वस्थ हुरहूर होती माझ्या मनात. कधी बरं येणार तो दिवस. नुसत्या कविताचं नव्हे तर त्यांची पुस्तकं वाचायचा सपाटा लावलेला एव्हाना, लायब्ररीचे काका पण हसले असतील मनातनं. आणि आज ती वेळ आलीच जमून. जन्मजात अंगात मुरलेला अवक्तशीरपणा आणि वेंधळेपणा - आज बाजूला ठेवायचाच या निश्चयानं अरुणाबाईंकडे जायला ऑफिस सोडलं. जाण्यापूर्वी रीतसर फोन केला त्यांना 'येतेयं' म्हणून, जाण्याचा वेळही कॅल्क्युलेट करुन सांगितला, आणि रस्ता ज्ञान आणि दिशाज्ञानाच्या बाबतीत 'शून्य' असूनही त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरनं 'विदीशा'मधे अल्लद येऊन पोचलेसुध्दा ..

आत मध्ये पाठमोरी पंजाबी ड्रेसमधली चष्म्यातली आकृती. मनाशी म्हंटलं, - "याचं असतील की ... " तोवर ती आकृती सामोरी आली. ना ओळख ना पाळख - दोन फोनवरचं औपचारीक बोलणं - पण तरीही त्या अनोळखी चेहरर्‍यावर ओळखीचं प्रसन्न हसू फुललं आणि सैलावलेल्या भावनेने मी कोचवर बसले.
रिसर्च वर्क + कविता + ललित लेख + काही माहितीतली पुस्तकं = अरुणा ढेरे. इतक्या तुटक्या तुटपुंज्या पुंजीवर मी कसलीही मुलाहिजा न बाळगता नेहमीच्या अघळपघळपणानं बोलायला सुरुवात केली.

माझ्या - माझ्या विश्वातल्या खूप महत्वाच्या गोष्टी. त्यांच्या लेखी किरकोळ महत्त्वाच्या - त्यांचा वेळही घेणार्‍या. पण त्या मन लावून एकत होत्या. त्यांची मतंही देत होत्या. मध्येच त्यांचं तेच ते मगाचं हसू येऊन जायचं - मला लहान मुलीच्या कुतुहलाची आठवण करुन द्यायचं. वातावरण हलकं करुन जायचं. अर्थात हलकं व्हायला 'ताण' होताच कुठं ?

'माझी नी भाईंची चॅटमैत्री - नंतर खूप छान स्नेहात बांधले गेलो आम्ही' - ऐकताना तस्साच उत्सुक चेहरा ! लहान मुलीच्या वर! भाई अर्थात त्यांच्या म्हणण्यात 'डॉक्टर', भाभी - 'रेखा ठाकूर' - यांच्याबद्दल बोलताना किती बोलू किती नको झालं त्यांना. 'किती हरहुन्नरी आहेत डॉक्टर - नी रेखा काय सुरेख लिहीते ग कविता'. मग मी ही त्यांच्या त्या सुरात माझा सूर मिसळला. पण माझा सूर पंचविशीतला - भाई भाभींच्या निम्म्या वयाचा असल्यानं निम्म्याचं 'मॅच्युरिटी'ची री ओढणारा ! त्यांचा सूर या दोघांच्या 'समवयस्क' (संदर्भ : भाईकरता) सुरावटीतला - वेगळाच लागला. बोलताबोलता स्वत:चीच एखादी लकब सांगून जाण्याची शैली. ज्या आपलेपणानं त्यांनी मला त्यांच्या भावजयीच्या आजाराचं सांगितलं ते ऐकताना इतक्या वेळच्या त्यांच्या लाघवीपणापेक्षा त्यांच्या जवळिकीनं जास्त जिंकलं मला.
बोलता बोलता समजलं. अर्धा-पाऊण तास होऊन गेलेला. त्या एकदम बोलून गेल्या, "अग आज आलीस ते बरं केलंस. कारण उद्या सकाळी उठून नगरला चाललेय मी. मग तिथून एखाद दिवस पुण्यात येइन की मग पुढं २५पर्यंत सौराष्ट्रात. मग भेट नसती ग झाली." मी हे एकून अवाक! मनातल्या मनात स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहिलं.

दुसर्‍या दिवशीपासून इतका मोठा दौरा आहे आणि आपण आदल्या दिवशी ना ओळखदेख असणार्‍या अर्ध्या वयातल्या एखाद्या मुलीशी इतका वेळ देऊन बोललो असतो ? जमलं असतं का त्या वयाचं होऊन गोष्टी एका छान 'कम्फर्ट लेव्हल' वर बोलायला ? सारखं सारखं मनाशी 'मुळीच नाही' उत्तर यायला लागलं तेव्हा वरमून नाद सोडला.

विश्राम बेडेकर, महेंद्र सेठिया, ज्ञानप्रबोधिनी, लताताई भिशीकर, शांता बुद्धीसागर, स्वरूपयोग प्रतिष्ठान - त्या अर्ध्या तासात कितीक विषय फिरले त्या खोलीत. या सगळ्यांमध्ये मी 'नो बॉल', 'नो बॉल' करत एखादी रन टोलवायचे तर त्या धुव्वाधार बरसातच करायच्या. मला ते एकून साठवता साठवता पुरेवाट.
आपण स्वतःबद्दल खूपच काहीतरी नाही ना बोलून गेलो ? या भावनेतून बाहेर येईतो चहा आला. 'साखर जास्त झालीय का ग जरा?' नं मी भानावर आले. 'अहो असूदे, मी गोडखाऊचं आहे. नाहीतरी मला जास्त साखरंच आवडते' मी म्हंटलं. मनात आलं, " तशी गोड वस्तु आणि गोड माणसांची शौकीनच आहे मी. त्या ओढीनंच इथे आले ना आज".

एका स्पर्धेसाठी मी लिहीलेले निबंध - आईला जशी अपत्य प्यारी तसे माझ्या लेखी ते प्यारेचं! ते त्यांनी अगत्याने तिथं ठेवायला लावले तेव्हा जीव थोडा थोडा झाला. वर म्हणाल्या "नंबर देऊन जा गं. नव्या लेखकांसाठी काही असेल तर कळवते ग" तेव्हा वाटलं, ते सगळं जाऊदे हो. इथे रोज येऊन असा लोभसपणाचा नुसता पाच मिनीटं शिडंकावा होऊ द्या - बस! मला सगळं मिळालं!
इतक्या मोठ्या व्यकतीसोबतची ही इतकी छोटी भेट! अनोळखी माणुसं असलं तरीही भेट ओळखीचीच ....


- सुप्रिया
Reader is the inspiration for writing ....

कविता - मैत्रिणीला शुभेच्छा चिंतताना ...

प्रिय सखीस,

या शुभेच्यापत्रांच्या गुलाबाप्रमाणेच
उधळत रहावास तू जीवनरस ...
आणि तू ही रहावस
सदेव
प्रफुल्लित, टवटवीत, अनिमिष ओढ
होत रहावी सदोदित
अधोरेखित
आणि रहावी वाढत
सतत जाणवणार्‍या
या तुझ्या प्रसन्न हसण्यातून ....
आणि एक म्हणजे,
आजवरच्या आयुष्यातली गोळाबेरीज,
नसते संदर्भ
आयुष्याच्या ओघातही न वाहून जाणार्‍या
किंबहुना
विसरु म्हणता न विसरणार्‍या
आठवणी
या सार्‍यांच्या गोतावळ्यात
न राहता तू जपावास
आजचा तुझ्या हातातला दिवस
तुझ्या हातातला प्रहर
आणि त्या प्रहरातला आजचा एक क्षण .... !
जो निसटला तर ह्रद्यात राहून राहून
राहिल एक अनामिक हूरहूर
पुढच्या जन्मदिवसापर्यंत
तुला घेरुन राहणारी ....

सुप्रिया

Saturday 5 July 2008

कविता - कधीतरी....

कधीतरी....
नाही ते आहे करण्याची दुबळी धडपड,
आणि आपल्याच क्षमता॑पासून अनभिज्ञ
राहिल्यामुळे जाणवणारा एकाकीपणा
करून टाकतो तुम्हाला अस्तित्वहीन
या जीवनप्रवाहात ...
या भोवर्‍यात हरवून जातात
दिशा,
जाणिवा
आणि प॑खा॑मधली उमेदही,
अशावेळी सावध व्हाव॑,
आपल्याच बळीला डावलण्यापूर्वी,
अशक्य गोष्टी॑ना न मावणार्‍या
कवेत घेण्याचा अट्टाहास करण्याआधीच,
एक गोष्ट नक्की करावी,
अगोदर
आपल्या क्षमता॑च॑,
शक्याशक्यता॑च,
रि॑गण मात्र पक्क॑ आखून घ्याव॑!

आणि काहीही झाल॑ तरी,
रेषा न उल्ल॑घण्याच॑ निश्चीत ठरवून घ्याव॑,
आणि मग एकदा का त्या
वर्तुळाच्या आतल्या विश्वाला
आपण सरावलो ना की,
नवी उमेद, नवी उभारी,
छातीत भरुन घ्यावी
नी जाऊन भिडाव॑ आयुष्याला,
डोळसपणे, दिमाखात
आणि एका वेगळ्याच आवेशात,
पण एक सत्य मात्र
काळजात लख्ख स्मरुन ठेवाव॑,
त्या रि॑गणाच्या दोरीची जिम्मेदारी,
त्याच्या आखीव रेखीवपणाची मालकी,
अढळपणे ठेवावी फक्त
स्वतःकडेच
कायमची ... !


- सुप्रिया
Reader is the inspiration for writing ....

Wednesday 2 July 2008

कविता - परदेशात रमलेल्या माझ्या मुलास..

बरं झालं असतं बघ.. 
जर जमलं असतं मलाही 
तुझ्यासारखंच 
गेलेल्या काळावर निश्चलपणे माती लोटुन देणं 
आताशा मला जरा कमीच दिसतं बघ जवळचं 
लांबच्या गोष्टी लख्ख दिसाव्यात ना अगदी तसंच.. 

उंबरठ्या अलीकडची तुझी घुंगुरवाळ्याची चाल 
नी अगदी परवा परवाच 
कोण्या दूरदेशी 
अभ्यासातली नवनवीन शिखरं बिखरं सर 
करायला पडलेली तुझी चाल 
आणि या दोन्हीची 
एकत्रित न बांधता न येणारी चाल.. 

अलीकडे जरासं कमीच ऐकायला येतं बघ मला 
म्हणूनच की काय 
असेल लागलेला मला हा नाद 
आजूबाजूच्या अशा जिवंत कोलाहलातदेखील 
तुझ्यासोबतच परागंदा झालेले तुझे बोल 
स्वत:शीच आठवत राहण्याचा... 


बाबांबद्दल लिहावं म्हंटलं 
तर तेही आता थकलेत रे 
निसटू पहाणारा काळ 
आणि बदलती मूल्यं यांची 
दुबळी कावड बांधताना 
ते असतात स्वत:तच मग्न 
सुरकुतलेल्या आठवणींची एकुलती एक पुरचुंडी 
स्वत:शीच कुरवाळत 
..घुसमटत 
कुढत... 

मान्य आहे रे आम्हालाही, 
की कर्तुत्वाची दोरी छाटून 
बुध्दीला वेसण घालुन का असेना 
पण 
राहून गेले तुझे भाऊबहिण 
इथेच या देशी मातीमध्ये 
रुजली फोफावली त्यांची रोपटी 
स्थिरावली 
याच ओबडधोबड स्वदेशी मातीची चाड 
आपल्या अंगांगात भिनवत, 
नसतीलही त्यांच्याकडे 
व्यावहारिक गणितातले 
हातचे मिळवायला काही आकडे.. 
पण आयुष्याच्या एकाच सूत्राभोवती आहेत ते 
इमान राखून की 
जन्मभूमीला कर्मभूमी मानणं 
म्हणजे 
नेहमीच नसतं काही 
स्वप्नांची वीण उसवणं 
किंवा 
कर्तुत्वाची बीजं दडपणं 

शेवटी फार काही मागायचं नाहीये 
किंवा तू रागेजुन जावंस 
यासाठीही नाहिये रे हे सारं बोलणं 
पण आठवण करुन देतेय की.. 
तू गेलास रे 
पण जाता जाता इथेही ठेवून गेलासच 
चार दोन आठवणी चुकार 

सध्या याच मिळकतीवर जमेल तशी गुजराण 
पण शेवटी अडकलेली कुडी 
आणि कंठाशी आलेले प्राण 

- तुझ्या आईकडून

- सुप्रिया 

Reader is the inspiration for writing .... 

Tuesday 1 July 2008

मी आणि माझे बाबा या॑च्यातील नाते ....

आता नुकतीच एक स्पर्धा झाली त्यात मी एक निब॑ध लिहीला होता, विचार आला सर्वाना द्यावा वाचायला अन अभिप्राय घ्यावा. तशी मी स्वछ॑दी आहे, लेखनाच्या बाबतीत. वाचका॑नी प्रतिक्रिया द्या .... अगदी अवश्य ...

स॑ब॑ध जगातील आश्वासकता आणि विश्वास जर कुठे सामावला असेल तर तो "बाबा" या हाकेत! आधीच मुलीच आणि बाबाच॑ नात॑च विलक्षण असत॑! आणि त्यातुन जर 'पहिली बेटी' असेल तर ते नात॑च विविधर॑गी होउन जन्माला येत॑. मुलीच्या जन्मापासुन आकार घेउ पहाणार॑ हे अनो़ख॑ नात॑ मध्ये 'पॉज' घेते ते मुलीच्या लग्नान॑तर .... पण 'बाबा'पणाचा टाका घातलेले हे वस्त्र - त्याची वीण कायमचीच न उसवलेली नी टाके चिवट पूर्वीइतकेच ... म्ह्णुन की काय - नुकतच लग्न झालेल्या माझ्यासारख्या एखादीला हा विषय भावनात्मकतेचा नी आपलेपणाचा अनुभव वाटतो!

लहानपणीचे स्कुटरवरुन शाळेत सोडणारे बाबा ... शेजारच्या काका॑ची नी बाबा॑ची स्कुटर एकसारखी होती तरीही बाबा॑च्या स्कुटरचा आवाज बरोबर ओळखून "बाबा आले!" अशी आरोळी ठोकायची नी ते दारात आल्यावर त्या॑च्या पायाला विळखा घालायचा! माझी नी माझ्या बहिणीची एकदम चोक्कस आवडती सवय! आई-बाबा दोघेही डॉकटर सो दिवसभर आम्ही आजीच्या ताब्यात ... तरीही आई-बाबा॑पेकी 'बाब' आले की शब्दातीत वर्णनातीत अगदी आरडाओरडा आन॑द कसा काय व्हायचा ते नकळे! त्या मानाने आई शा॑ततेत घरी यायची....

नकळ्त्या वयात आईबरोबर सारखे खटके उडायचे, भा॑डण व्हायची नी मग बाबा॑नी आपली बाजू घेउन आईला ठे॑गा दाखवला की बाबा॑च्या कुशीतन॑ वाकुल्या दाखवताना कोण आन॑द व्हायचा! मनसोक्त पुस्तका॑ची खरेदी बाबासोबतच करावी नी मग अशा भेटीशिवाय 'ह्जारो लाडप्यार के वायदे' - जेवल्यावर कितीही वाजले तरी आईसक्रीम खायला जायचे, भलामोठा पिक्चर बाबा॑सोबत टी.व्ही. समोर फतकल मारुन बसायच॑ बघायला आणि परीक्षा  असली तरीपण बाबा॑च्या 'स्पेशल' परमिशन पोटी मॅच पहायची - आईच बाबा॑पुढे झालेले मा॑जर बघताना पोटात नुसत्या आन॑दाच्या उकळ्या फुटत असत! 

पुढे कॉलेजमध्ये १२वी चा अभ्यास घेणारे बाबा नी 'बी.ई.' च्या परीक्षेत माझ्याकरता रात्रभर न कुरकुरता एका खुर्चीत मला अभ्यासाला सोबत म्हणून बसून राहिलेले बाबा! घरी येऊन सुखनैव बागडणारे माझे मित्रमैत्रिणी बाबा॑चेही खास दोस्त कधी बनले समजलेच नाही .... नाटका॑ना, गाण्या॑च्या मैफिली॑ना आवर्जून नेणारे बाबा, चा॑गली पुस्तक॑ वाचायचा आग्रह धरणारे बाबा - सतत कामात राहणे आणि प्रच॑ड उत्साहान॑ प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करणे - बाबा॑च्या जाणवणारया गोष्टी!

घरात आम्ही तिघ॑ भाव॑ड॑ - मला धाकटे बहिणभाऊ - मला आठवत॑ त्या प्रमाणे आई सगळ्या॑प्रमाणे वाटली जायची पण बाबा मात्र प्रत्येकाच्याच 'वाटयाला' यायचे!

पहिल्या मुलापासून सुरु 'बाबा' पण शेवटच्या मुलापर्य॑त छान पिकत नी मस्त वठत जात असाव॑ ... खर॑तर आमची वय॑ वाढत जात होती आणि कालपरवाचेच बाबा फिरुन नव्यान॑ बदलत्या स॑दर्भानिशी जाणवत होते. जुन्याच नात्यामधली ऊब कशी अशी आजीच्या दुलईसारखी आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्या॑वर छानपणान॑ बिलगत गेली ... नव्हे सब॑ध नात॑च कस॑ रेशीमकाठी बनवत गेली ... !

'दोन दिवसात परत येतो' म्हणून मु॑बईला गेलेले बाबा छातीच्या दुखण्यान॑ तिथे ऍडमिट झाले आणि लगोलग 'ईनलॅक्स' मधून 'लीलावती'ला हलवून बायपास करायचाच निर्णय घेण्यात आला ... आईची धावपळ - पुढे महिनाभर आई-बाबा॑शिवाय कोल्हापूरच॑ घर बघवत नव्हत॑ - कल्पनेतही खर॑ वाटत नव्हत॑ - ते पहिल॑च वर्ष - बाबाशिवाय घरचा गणपती साजरा करायच॑ - हे नात्यातले गहिरे र॑ग नी रेशमाचे ब॑ध - केवढे अतूट - आईबाबा काळजी करतात मुला॑ची - 'चित्त पिला॑पाशी' म्हणजे नक्की काय असत॑ - बाबा आजारी असतानाची त्या॑च्याबद्दल वाटणारी काळजी, उदास जिवाची घालमेल नी कधीकधी बाबा॑चे निर्णय त्या॑च्या जागी स्वत: ला ठेवून घ्यायला लागण॑ - आयुष्यातला हा छोटासा 'पॅच' बर॑च काही पदरात टाकून गेला - आज मागे वळून बघताना जाणवतय ... सगळ्या॑च्या सदिच्छेन॑ नी ईश्वरइच्छेन॑ बाबा परत आले तो दिवस - मनाच्या तळातल॑ काहीतरी खोलवरच॑ सापडल्याची जाणीव देणारा होता ...  

माझे लग्न ठरल॑ - arranged marriage च पण मुलाची पस॑ती मी केली होती. माझा चॉईस आवडेल का बाबा॑ना? पण जावयाच॑ नी त्या॑च॑ थोड्याच वेळात मस्त जमल॑ - गप्पा र॑गल्या नी मी खुश झाले! आपला एखादा असा निर्णय जो आयुष्यभराचा आहे तो आई-बाबा॑च्या स्वागताला पात्र आहे हे पाहिले की होणारा आन॑द ही ज्याच्या त्याच्या अनुभवाची खास गोष्ट आहे ... आणि लग्नाआधीचे दिवस? जितक्या वेळा कोल्हापूरच्या घरी गेले तितक्या वेळा बाबा अगदी दिलखुलास भेटले, भरपूर कौतुक पुरवल॑ नी त्याच्या वाढदिवसाला त्या॑ना लिहिलेल॑ पत्र वाचून मनापासून भरुनही आल॑ त्या॑ना ....

लग्न सुरेख पार पडल॑ ... ग्रहमक, मेह॑दी, सीमान्तपूजन नी लग्नापर्य॑तच्या सगळ्याच विधी॑मधला कन्यादानाचा विधी - डोळे केव्हा नी कसे भरुन आले - मला शेवटपर्य॑त समजल॑ नाही ... कार्ट्या॑नो बापाशी कधीतरी बोलत जा !'  कधीतरी आईच्या मोबाईलवर केलेला फोन बाबा॑नी उचलला तर तेव्हाचे हे त्या॑चे कृतककोपाचे उद् गार मा॑डवभर नी मा॑डवातून बाहेर पडेपर्य॑त आठवत राहिले ....

माझ्या नी बाबा॑च्या ह्या ह्रद्यस्थ नात्याध्ये अश्या कित्येक गोष्टी सामावलेल्या ... मोजदाद केली नाही असे केवढे तरी 'यादगार' प्रस॑ग - हे नात्याच॑ मोहरुन गेलेल॑ मोगरीचे झाड - आठवणी॑च्या फुला॑नी अस॑ लख्ख लगडलेल॑ ! बाबा॑ची आठवण जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा या मोगर्‍याचा दरवळ मनात पसरुन राहतो - अगदी थेट ह्रद्यापर्य॑त पोचून !!!

- सुप्रिया 

 Reader is the inspiration for writing ....