Monday 2 August 2010

लंडन डायरी भाग ३ : २६२ , वॉल्टन रोड , वोकिन्ग वरून - लंडन लाईफ सुरू झालं तेव्हा ..

### नवर्याच्या सामानात हे एवढे टिन फूड आणि मॅगी किंवा तत्सम सिरिअल्सची पाकिटे पाहूनच मला धसकायला झालं ! "मी नाही असलं खाणार डब्यातलं पॅकबंद खाणं! " मी जाहीर करून टाकलं .. लगोलग नवर्याचे उत्तर आले "मग बनव स्वतःच ! " मनात म्हणलं "ते परवडलं ! असलं डब्यातलं खाण्यापेक्षा स्वतः बनवलेलं - कसं का असेना (!) पण चांगलं लागेल.." झालं ! दुसर्याच दिवशी आम्ही इथल्या जवळच्याच स्टोअरमधून थोडे किराणा मालाचे सामान आणले..वस्तुन्च्या किमतींचे रूपयात कन्वर्जन नाही करायचे असे आम्ही दोघेही सतत एक्मेकाना आणि मनाशी बजावत होतो .. पण कळत नकळत ते होऊन जायचे आणि "काय हे ! ही वस्तू तर अमूक अमूक इतकी स्वस्त मिळते नै आपल्याकडे! " असे उद्गार आमच्या ओठांवर यायचे आणि हसायला यायचं - नाईलाजाने! काय करणार ? पापी पेटका सवाल इत्यादि इत्यादि था! भाज्या आपल्याकडच्या भाज्यान्सारख्याच फक्त जरा घट्ट सालीच्या आणि ताज्या ... पाकिस्तानी / इराणी माणसाचं स्टोअर असावं॥ इथे Atif म्हणून एक दुकानांची चेन आहे .. मला आपली सारखी आपल्या कळकट मार्केट यार्ड ची आठवण यायला लागलेली .. कितीही स्वच्छता ठेवा ... कितीही प्रशस्त मांडामांड करा दुकानाची ... पण ते मग्रूर भाव चेहर्यावर खेळवत "वैनी अवो आमाला तरी परवडायला पायजे का नको?" असे तालात म्हणत मस्तपैकी भाजीच्या ढिगार्याआड मांड ठोकून बसलेल्या पुणेकर भाजीवाल्याकडून घासाघीस करत , आपला आत्मा एका विशिष्ट बार्गेनिंग वॅल्यूवर न तळमळता स्थिरावत , दोन्ही हातांत भाजीच्या पिशव्यांचा डिस्को डान्स करत मनावर ताबा ठेवत सुट्टे पैसे त्या भाजीवाल्याला देऊन जी काही भाजी आपल्या ताब्यात येते तिला पाहूनच जीव कसा धन्य होऊन जातो ! वर भाव केल्याचं एक मन भरून असलेलं समाधान! :) पण एनिवेज .. इथे प्लॅस्टिक कंटेनर्स , टिश्यू पेपर्स , टिन्सचा वापर खूप दिसतो आहे असे नवर्याला म्हणले तर तो म्हणाला "हो वापर भरपूर आहे पण इथली प्रत्येक गोष्ट रिसायकल होते हे आहे का ठाऊक ? "

### स्वयंपाकघरात शिरले ..छान आहे हे स्वयंपाकघर...प्रशस्त आणि आमने सामने ओटे असणारं .. ही फ्याशन सध्या आपल्याकडे देखील रूजू घातली आहे .. गॅस आपल्यासारखाच आहे .. नवर्याचा कुणी एक मित्र आणि त्याची बायको आधी वर्षभर इथे राहात होते म्हणे ..तर ती कनवाळू माऊली माझ्याकरता काही सामान आणि भांडी मागे ठेऊन गेली होती .. (नंतर समजलं कप्पाळाची कनवाळू! त्यांचं म्हणे सामानच खूप जास्त झालेलं इथनं निघताना ... सो काही भांडी व सामान ठेवावेच लागले .. :)जाउदे ... भांडी मिळाली वापराकरता हेही नसे थोडके ! कारण इथे मुख्य अडचण डब्यांची झाली .. आई आणि सासूबाईंची आठवण ठायी ठायी ठाण मांडायला लागली .. त्या दोघी हॉटेलमधले प्लॅस्टिकचे डबे कसे रियूज करतात याची .. इथे दूध पिशवीतून नव्हे तर प्लॅस्टिक कॅन मधून येतं .. म्हणलं चला .. आता असे कॅन साठवून वापरता येतील ... आणि हो , सिंकमध्ये दोन नळ आहेत .. एक २४ तास गरम म्हणजे बॉइलरमधून येणार्या गर्मागरम पाण्याचा आणि दुसरा गार म्हणजे मस्तकात ति़डीक जाईल इतक्या बर्फाळ गार पाण्याचा .. नेहेमी हात धुताना / भांडी घासताना (हो ना आपली भांडी आपणच घासायची .. कामवालीचं सुख इथे नाहीच ना नशिबात ! )ही पाण्याची अ‍ॅड्जस्ट्मेण्ट करायचे सतत भान ठेवावे लागायचे .. स्वयंपाकघराच्या मागे पोर्च आहे .. मस्त हिरवळ आणि त्यात दोन दोनच्या ओळीत टाकलेल्या फरश्या! पण .. हा पणच जिथे तिथे आडवा येतो ना .. हाय कम्बख्त! दिवस उजाडतो तोच ७ नंतर आणि मावळतो ३.४५ ला .. शिवाय अत्यंत कमी तापमान , अधनंमधनं वाहणारे गार वारे आणि भरीला भर म्हणजे कधीही येणारा पिरपिरा पाऊस! कुणीसं म्हंटलेलं एक फेमस वाक्य आहे ना "If you do not like London's weather then wait for10 minutes .. It will change! " असो . तर स्वयंपाकघरात माइक्रोवेव्ह पण आहे ... फक्त मिक्सर नाही . .. मनातल्या मनात मशिन्समुळे आलेल्या परावलंबित्वाची जाणीव होऊन चडफडत स्वयंपाक सुरू केला .. नवर्याच्या यू.के. मध्ये रहात असलेल्या बहिणीने - मोनालीने कुकर , पोळपाट-लाटणं देऊन फार सुकर केलं आमचं स्वयंपाकाचं आयुष्य!

क्रमशः




No comments:

Post a Comment