Wednesday 2 July 2008

कविता - परदेशात रमलेल्या माझ्या मुलास..

बरं झालं असतं बघ.. 
जर जमलं असतं मलाही 
तुझ्यासारखंच 
गेलेल्या काळावर निश्चलपणे माती लोटुन देणं 
आताशा मला जरा कमीच दिसतं बघ जवळचं 
लांबच्या गोष्टी लख्ख दिसाव्यात ना अगदी तसंच.. 

उंबरठ्या अलीकडची तुझी घुंगुरवाळ्याची चाल 
नी अगदी परवा परवाच 
कोण्या दूरदेशी 
अभ्यासातली नवनवीन शिखरं बिखरं सर 
करायला पडलेली तुझी चाल 
आणि या दोन्हीची 
एकत्रित न बांधता न येणारी चाल.. 

अलीकडे जरासं कमीच ऐकायला येतं बघ मला 
म्हणूनच की काय 
असेल लागलेला मला हा नाद 
आजूबाजूच्या अशा जिवंत कोलाहलातदेखील 
तुझ्यासोबतच परागंदा झालेले तुझे बोल 
स्वत:शीच आठवत राहण्याचा... 


बाबांबद्दल लिहावं म्हंटलं 
तर तेही आता थकलेत रे 
निसटू पहाणारा काळ 
आणि बदलती मूल्यं यांची 
दुबळी कावड बांधताना 
ते असतात स्वत:तच मग्न 
सुरकुतलेल्या आठवणींची एकुलती एक पुरचुंडी 
स्वत:शीच कुरवाळत 
..घुसमटत 
कुढत... 

मान्य आहे रे आम्हालाही, 
की कर्तुत्वाची दोरी छाटून 
बुध्दीला वेसण घालुन का असेना 
पण 
राहून गेले तुझे भाऊबहिण 
इथेच या देशी मातीमध्ये 
रुजली फोफावली त्यांची रोपटी 
स्थिरावली 
याच ओबडधोबड स्वदेशी मातीची चाड 
आपल्या अंगांगात भिनवत, 
नसतीलही त्यांच्याकडे 
व्यावहारिक गणितातले 
हातचे मिळवायला काही आकडे.. 
पण आयुष्याच्या एकाच सूत्राभोवती आहेत ते 
इमान राखून की 
जन्मभूमीला कर्मभूमी मानणं 
म्हणजे 
नेहमीच नसतं काही 
स्वप्नांची वीण उसवणं 
किंवा 
कर्तुत्वाची बीजं दडपणं 

शेवटी फार काही मागायचं नाहीये 
किंवा तू रागेजुन जावंस 
यासाठीही नाहिये रे हे सारं बोलणं 
पण आठवण करुन देतेय की.. 
तू गेलास रे 
पण जाता जाता इथेही ठेवून गेलासच 
चार दोन आठवणी चुकार 

सध्या याच मिळकतीवर जमेल तशी गुजराण 
पण शेवटी अडकलेली कुडी 
आणि कंठाशी आलेले प्राण 

- तुझ्या आईकडून

- सुप्रिया 

Reader is the inspiration for writing .... 

2 comments:

  1. Hello Dear Manaswineeeeeeee...

    Its a very e-motional piece Dear!
    w'ful Job.
    Congrats to u n of course to
    Mr Khot in Qatar!
    {Here, u r in katar!)
    Its u mam ... n nt dat
    "soft wear Gawandee"

    Nicely written... Keep it up ...

    - Sunjay Awate

    ReplyDelete
  2. Mastach kavita ahe.
    Tujhich ahe ka vatavi itaki masta.
    Reagards
    Bhai

    ReplyDelete