Sunday 6 July 2008

अरुणा ढेरेंशी भेट

नोव्हेंबर २००६
पुणे
खूपशी निवांत वेळ

गेले चार आठ दिवस एका वेगळ्याच धुंदीत वावरत होते मी. जेव्हापासून भाईंनी सांगितलं 'एक पार्सल तुला अरुणा ढेरेंना द्यायचंय' तेव्हापासून वरवर शांत पण आतून अस्वस्थ हुरहूर होती माझ्या मनात. कधी बरं येणार तो दिवस. नुसत्या कविताचं नव्हे तर त्यांची पुस्तकं वाचायचा सपाटा लावलेला एव्हाना, लायब्ररीचे काका पण हसले असतील मनातनं. आणि आज ती वेळ आलीच जमून. जन्मजात अंगात मुरलेला अवक्तशीरपणा आणि वेंधळेपणा - आज बाजूला ठेवायचाच या निश्चयानं अरुणाबाईंकडे जायला ऑफिस सोडलं. जाण्यापूर्वी रीतसर फोन केला त्यांना 'येतेयं' म्हणून, जाण्याचा वेळही कॅल्क्युलेट करुन सांगितला, आणि रस्ता ज्ञान आणि दिशाज्ञानाच्या बाबतीत 'शून्य' असूनही त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरनं 'विदीशा'मधे अल्लद येऊन पोचलेसुध्दा ..

आत मध्ये पाठमोरी पंजाबी ड्रेसमधली चष्म्यातली आकृती. मनाशी म्हंटलं, - "याचं असतील की ... " तोवर ती आकृती सामोरी आली. ना ओळख ना पाळख - दोन फोनवरचं औपचारीक बोलणं - पण तरीही त्या अनोळखी चेहरर्‍यावर ओळखीचं प्रसन्न हसू फुललं आणि सैलावलेल्या भावनेने मी कोचवर बसले.
रिसर्च वर्क + कविता + ललित लेख + काही माहितीतली पुस्तकं = अरुणा ढेरे. इतक्या तुटक्या तुटपुंज्या पुंजीवर मी कसलीही मुलाहिजा न बाळगता नेहमीच्या अघळपघळपणानं बोलायला सुरुवात केली.

माझ्या - माझ्या विश्वातल्या खूप महत्वाच्या गोष्टी. त्यांच्या लेखी किरकोळ महत्त्वाच्या - त्यांचा वेळही घेणार्‍या. पण त्या मन लावून एकत होत्या. त्यांची मतंही देत होत्या. मध्येच त्यांचं तेच ते मगाचं हसू येऊन जायचं - मला लहान मुलीच्या कुतुहलाची आठवण करुन द्यायचं. वातावरण हलकं करुन जायचं. अर्थात हलकं व्हायला 'ताण' होताच कुठं ?

'माझी नी भाईंची चॅटमैत्री - नंतर खूप छान स्नेहात बांधले गेलो आम्ही' - ऐकताना तस्साच उत्सुक चेहरा ! लहान मुलीच्या वर! भाई अर्थात त्यांच्या म्हणण्यात 'डॉक्टर', भाभी - 'रेखा ठाकूर' - यांच्याबद्दल बोलताना किती बोलू किती नको झालं त्यांना. 'किती हरहुन्नरी आहेत डॉक्टर - नी रेखा काय सुरेख लिहीते ग कविता'. मग मी ही त्यांच्या त्या सुरात माझा सूर मिसळला. पण माझा सूर पंचविशीतला - भाई भाभींच्या निम्म्या वयाचा असल्यानं निम्म्याचं 'मॅच्युरिटी'ची री ओढणारा ! त्यांचा सूर या दोघांच्या 'समवयस्क' (संदर्भ : भाईकरता) सुरावटीतला - वेगळाच लागला. बोलताबोलता स्वत:चीच एखादी लकब सांगून जाण्याची शैली. ज्या आपलेपणानं त्यांनी मला त्यांच्या भावजयीच्या आजाराचं सांगितलं ते ऐकताना इतक्या वेळच्या त्यांच्या लाघवीपणापेक्षा त्यांच्या जवळिकीनं जास्त जिंकलं मला.
बोलता बोलता समजलं. अर्धा-पाऊण तास होऊन गेलेला. त्या एकदम बोलून गेल्या, "अग आज आलीस ते बरं केलंस. कारण उद्या सकाळी उठून नगरला चाललेय मी. मग तिथून एखाद दिवस पुण्यात येइन की मग पुढं २५पर्यंत सौराष्ट्रात. मग भेट नसती ग झाली." मी हे एकून अवाक! मनातल्या मनात स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहिलं.

दुसर्‍या दिवशीपासून इतका मोठा दौरा आहे आणि आपण आदल्या दिवशी ना ओळखदेख असणार्‍या अर्ध्या वयातल्या एखाद्या मुलीशी इतका वेळ देऊन बोललो असतो ? जमलं असतं का त्या वयाचं होऊन गोष्टी एका छान 'कम्फर्ट लेव्हल' वर बोलायला ? सारखं सारखं मनाशी 'मुळीच नाही' उत्तर यायला लागलं तेव्हा वरमून नाद सोडला.

विश्राम बेडेकर, महेंद्र सेठिया, ज्ञानप्रबोधिनी, लताताई भिशीकर, शांता बुद्धीसागर, स्वरूपयोग प्रतिष्ठान - त्या अर्ध्या तासात कितीक विषय फिरले त्या खोलीत. या सगळ्यांमध्ये मी 'नो बॉल', 'नो बॉल' करत एखादी रन टोलवायचे तर त्या धुव्वाधार बरसातच करायच्या. मला ते एकून साठवता साठवता पुरेवाट.
आपण स्वतःबद्दल खूपच काहीतरी नाही ना बोलून गेलो ? या भावनेतून बाहेर येईतो चहा आला. 'साखर जास्त झालीय का ग जरा?' नं मी भानावर आले. 'अहो असूदे, मी गोडखाऊचं आहे. नाहीतरी मला जास्त साखरंच आवडते' मी म्हंटलं. मनात आलं, " तशी गोड वस्तु आणि गोड माणसांची शौकीनच आहे मी. त्या ओढीनंच इथे आले ना आज".

एका स्पर्धेसाठी मी लिहीलेले निबंध - आईला जशी अपत्य प्यारी तसे माझ्या लेखी ते प्यारेचं! ते त्यांनी अगत्याने तिथं ठेवायला लावले तेव्हा जीव थोडा थोडा झाला. वर म्हणाल्या "नंबर देऊन जा गं. नव्या लेखकांसाठी काही असेल तर कळवते ग" तेव्हा वाटलं, ते सगळं जाऊदे हो. इथे रोज येऊन असा लोभसपणाचा नुसता पाच मिनीटं शिडंकावा होऊ द्या - बस! मला सगळं मिळालं!
इतक्या मोठ्या व्यकतीसोबतची ही इतकी छोटी भेट! अनोळखी माणुसं असलं तरीही भेट ओळखीचीच ....


- सुप्रिया
Reader is the inspiration for writing ....

1 comment:

  1. chhan lihilay lekh. aavaDatya lekhakacha maaNus mhaNoon hoNara darshanhi aavaDaNa hee moThya aanandachi goShTa.

    ReplyDelete