Tuesday 15 July 2008

प्रवास आयुष्याचा

मला वाटतं की आयुष्यात माणसानं कायम पुढं चालत रहावं. काळासोबत स्वतःला घेऊन जावं. बर्‍याचदा काळाचा प्रवास आणि आपला प्रवास यांचं गणित कुठेतरी चुकतं जातं, त्यात विसंगती पडत जाते आणि कसल्यातरी अडनिड्या तिढ्यातच आपण आयुष्य जगत राहतो. म्हणून युगानुयुगं चालत आलेली आयुष्यासाठीची 'प्रवास' ही उपमा अतिशय समर्पक आहे. आपण पुर्‍या तयारीनिशी प्रवासाला निघतो. बरीचशी ठिकाण 'कव्हर' करावा असं डोक्यात असतं. पण खूपदा दोन ठिकाणांच्या मध्ये भेटणारी ठिकाणंच जास्त हवीहवीशी, विसाव्याची आणि थांबावीशी वाटायला लागतात. तिथलं सौंदर्य मनाला लुभावून टाकतं. पण म्हणून काय आपण आपलं सगळं सामान तिथंच पसरून तिथं वस्तीला राहात नाही, किंबहुना राहू शकत नाही, 'अजून बराच पल्ला गाठायचाय. दरम्यान एखादं सुंदर ठिकाण जरी लागलं, तरी कायमस्वरुपी विश्रांतीचं काही ते होऊ शकत नाही ... ' या भावनेनं का असेना, पण बळंबळंच आपल्याला त्या ठिकाणी पसरलेला पसारा आवरता घ्यावा लागतो नी पुढच्या प्रवासासाठी निघावंच लागतं.

हां पण एक गोष्ट खरी असते - दोन महत्त्वाच्या ठिकाणांमधली - अधलीमधली ही विसाव्याची ठिकाणंच, पुढच्या लाबं खडतर पल्ल्यासाठी आवश्यक ते बळ पुरवत रहातात. तो विसावा, तो गारवा, तिथला आनंद एकदा जवळ साठवून ठेवला की मग पुढच्या प्रवासासाठीचा रस्ता खूपसा सुकर होतो...

अगदी अस्सचं आयुष्याच्या बाबतीत वागता येईल? ती मधली विसाव्याची ठिकाणं म्हणजे माणसं मानली तर जितक्या निर्लेप मनानं आपण पुढच्या प्रवासाला जातो. तितक्याच निर्लेप मनानं आपण त्यांच्यापासून दूर होऊन पुढच्या आयुष्याकडं 'काही घडलचं नाही' या तटस्थ भावनेनं पाहु शकु?

प्रिया
Reader is the inspiration for writing...

No comments:

Post a Comment