Thursday 25 September 2008

पाँडिचेरी भेट - भाग सहा - साधना रानडेंची भेट

३० सप्टेंबर

आजचा दिवस विशेष म्हणावा लागेल. आल्यापासून या ना त्या कारणानं पुढे ढकललं गेलेलं एक काम - एका स्नेहमूर्तीशी भेट - साधना रानडें ची भेट आज होणार होती. कालच्या त्यांच्या फोनवरच्या आवाजातली आपुलकी, मन:पूर्वकता जाणवून देणारं हसु आणि अदब - नकळत मनात एक प्रतिमा येऊ पहात होती. ९.३० ते १० च्या दरम्यान भेटायचे ठरले. मनातला उत्सुकतेचा भाव ओठांवर यायचा राहिला होता इतकचं. बाबा वरुन काही दाखवत नसले तरी त्यांचीही अवस्था फार काही निराळी नसणार.
साधारण पावणेदहाला आम्ही दोघे आश्रमात पोचलो. आजी, मामा व नुलकर काका, काकू आधी ५ -१० मिनिटे जाऊन पोचले होते. अतिशय शांततेत समाधीचे दर्शन घेऊन उजव्या हाताला आम्ही वळलो. Restricted Entry मध्ये अर्थातच आजीच्या वजनामुळे आत शिरलो. आतमध्ये शांतपणे उभी काउंटरर्स. उजव्या काउंटरपाशी बसलेला, हुबेहुब श्री ऑरोबिंदोंची आठवणं करून देणारा एक तेजःपुंज युवक - ओळखलं - हाच श्रध्दाळू रानडे! आणि डाव्या बाजूला नजर वळवली तर आजी डाव्या बाजूला खुर्चीमध्ये बसलेली. तिच्या डाव्या हाताला काउंटरवर एक व्यक्ती - तिला आमच्या समोरच्या दोन जणांनी झाकल्यामुळे नीट न दिसणारी -
 
नंतर त्या व्यक्तीच बोलणं संपले आणि 'ती' व्यक्ती नजरेच्या टप्प्यात आली. साधारण मध्यम बांधा, नजरेत येणारी उंची. गुलाबी रंगाची साडी, अवर्णनीय साधेपणा पण डोळ्यांच्या आणि चेहर्‍याच्या अत्यंत तेजामुळे शोभून दिसणारी मूर्ती - आश्रमाच्या डिवोटी - साधना रानडे! त्यांच्याबद्दल जितकं एकलं होतं, जितकं माहिती होतं त्याहीपेक्षा जबरदस्त व्यक्तिमत्व! आत्ता इथे मला त्यांच्याबद्दल थोडे सांगावं लागेल. साधारण ७०-८०च्या काळामध्ये मुलगा ३ महिन्यांचा, थोडी मोठी मुलगी आणि नवरा यांच्या सोबत येथे आलेली ही युवती - मदरच्या आदेशावरुन आणि त्याहीपेक्षा स्वेच्छेने म्हणून येथे आश्रमात राहिली आणि इथलीच एक होऊन गेली. श्री माताजींचा वरदस्पर्श तर तिला लाभलाच पण सर्वात भाग्यवान ठरला तो तिचा लहानगा. श्रध्दाळू असे नामकरण झालेला हा छोटा मुलगा पूर्णतया MP Pandit  म्हणून श्री मांचे जे  डिवोटी होते त्यांच्या हाताखाली अगदी तावून सुलाखून निघाला. दाढी आणि एकूणच व्यक्तिमत्वामुळे थेट श्री ऑरोबिंदोंची आठवण करून देणारा, 'सावित्री' या महाकाव्यावर प्रचंड अभ्यासानिशी अस्खलित इग्रजीतून रसाळ व्याख्याने देणारा हा युवक कॉम्प्युटर इंजीनियरही आहे हे एकल्यावर चकीत झाले मी! सर्वच क्षेत्रात लीलया वावरणारी ही प्रज्ञावान माणसं ... किती हे पूर्वसुकृत - त्याचे आणि त्याच्या जन्मदेचेही!
 
तर साधनाताईंशी झालेली ही भेट अगदी रोमांचकारी होती. त्यांच्या डोळ्यांमध्ये थेट पहाणे मला तरी अशक्य वाटतं होते ... कारण की स्नेहाने भरलेली ती नजर, साधनेच्या तेजाची साक्षीदार ... पेलणे तेव्हातरी शक्य नव्हते. मला व बाबांना बघताक्षणी उदगरल्या ,"तुम्हाला अजून खूप वाचायला हवे. आजीने इथवरं आणून सोडलयं. पुढचा प्रवास तुमच्या हातात आहे. खूप वाचा, जाणून घ्या. श्री माताजी आहेतच ... " पूर्ण घरामध्ये त्यांना अमोघच (माझा धाकटा भाऊ) आवडला. त्याच्या डोळ्यामधला भाव विलक्षण सुंदर असल्याचे त्या पुन:पुन्हा सांगत होत्या. (अमोघचा फोटो त्यांनी पाहिला). मला त्यांना ऐनवेळी काय द्यावे न सुचल्याने पटकन डायरी पुढे केली. मनात धाकधूक. आपण यांना इतक्या उत्साहाने वाचायला देतोय खरे पण आपली तेवढी पात्रता ... इतक्यात काही पाने नजरे खालून घालताच उद्गरल्या ... "Who made you a computer engineer? Because more than engineering, you are a literary person. साहित्यात आतापर्यंत पडली असतीस तर खूप पुढे गेली असतीस." मनात सहज प्रतिसाद उमटला. "शेवटी सारेच मनाजोगे घडते थोडेचं?'  असो. एकूणच  अपेक्षेपेक्षा आपण बरेच बरे लिहीले ही जाणीवही सुखकारक होती. शेवटपर्यंत त्या मला सांगत राहिल्या, "तुझी आजी ही अतिशय kind hearted person आहे. तिची पोच फार दूरवर आहे. तिच्या ज्ञानाचा फायदा करुन घ्या. ज्ञान मिळवणे म्हणजे अगदी तिच्या खनपटीस बसून तिच्याकडून ते हासिल करुन घेणे नसून, तिच्याजवळ दिवसातून किमान ५-१० मिनिटे का होईना पण बसणे" . हे  ऐकता ऐकताच आजी म्हणजे हे केवढे ज्ञान 'अनंत हस्ते कमलावराने' आहे आणि आम्ही साधे दोन करही फैलावतो तेही कद्रुपणाने, या जाणीवेने डोळे पाणावत राहिले ...
 
सरतेशेवटी निघायचा दिवस उजाडला. तसे आम्ही कोणीच नव्हेत पाँडिचेरीचे. पण गेल्या ४-५ दिवसात मातृमंदिर, रमणाश्रम आणि साधनाजींकडून जे काही इतकं भरभरुन मिळत गेलं त्यानं स्वत:चा थिटेपणा तर उमगलाच पण जोडीला नकळत का होईना, पण जाणिवेची खोली रुंदावत होती, receiptvity भी क्या चीज होती है - समजत होतं. इथून आपण काय घेतलं - काय न्यायचं - अंतर्मुख होताना कुठेशी ऐकलेली एक गोष्टच नजरेसमोर तरळत राहिली. फार पूर्वी गाडल्या गेलेल्या 'ममी' इजिप्त मध्ये जेव्हा परवा परवा पुनःश्च खणल्या गेल्या त्यावेळी तिथे जे काही बरेच पदार्थ मिळाले त्यात मिळाल्या कसल्याशा बिया. होय, चक्क चांगल्या स्थितीतल्या, त्यातल्याच काही उत्खननकाराने त्या उत्साहानं एका कुंडीत लावल्या. आता काय होईल, या विचारात तो असतानाच एके दिवशी त्यानं पाहिलं तर त्या बियांनी मूळ धरलं होतं, बीजानं मातीचा बंध पुन्हा एकदा झंकारले होते आणि मातीतून इवलासा कोंब  फुटू पाहत होता. आपणही इथून एखादं का होईना, पण कळत नकळत एखादं बीज सोबत घेऊन जाऊ आणि निगुतीनं निगराणी करत राहू. न जाणो बीज रुजायला किती काळ होईल - पण कधी ना कधीतरी त्याचा रुजावा मातीला हाक घालेल नी कोंब वर येऊ पाहेल.
 
थोडक्या अवधीत, कसलीही पूर्व जवळीक नसताना, या श्री ऑरोबिंदो आणि श्री मांच्या कर्मभूमीनं आम्हाला बांधून ठेवणारा लळा लावला. म्हणून मद्रास साठी रवाना होण्याआधी पाय इथून निघताना जड व्हायला लागले नी कुठलेसे अनामिक कढ घशाशी येऊन थांबले....

समाप्तः
सुप्रिया

पाँडिचेरी भेट - भाग पाच - मातृमंदीर आणि रमण आश्रम

तर पुढंचा megaevent होता... मातृमंदीर

तिथे एक प्रचंड मंदीर - मातृमंदीर होते - कळसाशी घुमटाकार होत जाणारे. सुरुवातीपासूनच शांतता ठेवली जात होती म्हणजे निदान लोकांनी बाह्यत: तरी शांत रहावं याकरीता - थोडक्यात हळुहळु स्वत:पासूनच सुरुवात करणे हा सोपा धडा मिळत होता! पुढे त्या प्रचंड घुमटाकार वास्तुमध्ये आम्ही गोलाकार जिन्यावरुन वर चढत राहिलो. सर्वात वरती कळसाशी मातृमंदीर पाहून २ कल्पना जाणवून गेल्या. 

एकतर मदरना म्हणायचे असावे की - सर्व काही खालीच सोडून द्या. शांतता जाणवू द्या. इतकया उंचीवर या - तुम्हाला आपोआप एकाग्रता जाणवेल किंवा गुंतागुतीच्या शरीरप्रक्रियेतला महत्त्वाचा भाग - मस्तक - मस्तकाशी जाणिवेचा निगम करा. कुंडलिनी जागृती सुध्दा अशीच शेवट - चिदाकाशात होणे - असा विचार - गुरफटतच मातृमंदीरत पोहोचलो. आत गेल्यावर जे काही घडलं / जाणवलं किंवा अनुभवलं ते व्यक्त करणं म्हणजे वार्‍याला चिमटीत धरणं किंवा कालचक्र उलटं फिरवणं जमलं तरचं ते लिहिता येइल. एक प्रचंड शांततेची लाट, आपणं तिच्यात बुडतोय. कानात शांती, डोळे शांत. चित्त शांततेत उठवणारे तरंग - भेलकांडत स्थिर होऊ पाहतंय शांततेची अजोड अनुभूती. सगळीकडे प्रगाढ शांतता नी समोर दिसणारा चौकोनावर ठेवलेला प्रचंड लोलक नी वर पासून केवळ सूर्यप्रकाशात न्हालेली जागा. एक

रम्य, अदभुत अनुभव. वाटलं की यातली जर थोडी शांती, थोडा चैतन्याचा कणशः का होईना पण भाग जर नेता आला तर? स्वर्गात जायची संधी मिळाली पण परतताना त्या रससुधेतला थोडासा बिंदुरुपी भाग नेता आला तर? आणि मग लक्षात आलं - नव्हे लख्ख जाणवत गेलं की हे मातृमंदीर - तुमचं शरीर नी चित्त स्थिर करण्याच्या, निर्विचाराच्या केवळ इवल्याशा प्रकाशानं तुमचं चिदाकाश उजळून निघणार आहे. कसं सुचलं असेल हे त्या मातेला नी त्या तत्त्वदर्शी ऋषिवराला? जगजेत्यानंही इथं झुकावं अशी अवर्णनीय कल्पनाशक्ती नव्हे तिचा इथे झालेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा विस्फोट ! पण राहून राहून वाटतयं, असेल का आपल्यात ते चैतन्य किमान जाणवण्याइतपत का होईना पण पात्रता?

२९ सप्टेंबर

आज सकाळी हो /  नाही करता करता एकदाचे तयार झालो नी रमण आश्रमाची गाडी धरली. आम्ही दोघेही रमणाश्रमाबद्दल पूर्णतया अनभिज्ञ! फक्त ते एक सेल्फ रिअलायझेशन असणारे ऋषीवर होते इतकेच माहिती. गाडीला दुतर्फा भाताची रोप लावणी झालेली शेतं नी साधारण हिरवागार परिसर! काही वेळातर माझ्या डोळ्यांसमोर आपल्या इथला राधानगरी रोडच तरळू लागला. ११.०० वाजता आम्ही तेथे जाऊन पोचलो. माकडं, कुत्री नी मोरांना एकत्र पाहिलं. मोरांचा केकारव - माणसाळलेले मोर आणि भव्य हॉलसकट ध्यानमंदीर असणारा तो रमणाश्रमाचा रम्य परिसर. महर्षींना १६व्या वर्षीच आत्मज्ञान प्राप्त झालं. ती त्यांच्या अकस्मित आजारपणाची गोष्ट - मग देहापासून वेगळे 'मी'चे अस्तित्व जाणवले. सर्वच सर्व सुरुवातीपासून स्वरुपानंदांच्या चरित्राशी मिळतेजुळते. मी आता घरी गेल्यावर आईला विचारेन. नंतरचा प्रसाद तर मन आणि जिव्हा - दोन्हीही लोभवणारा. पायसम आणि खजुराचं गोड खाऊन 'जीव धन्य जाला'. एकूणचं आजचा प्रवास छान - ठिकाणं सुंदर नी ध्यान ही चांगले झाले.

क्रमशः

सुप्रिया

Monday 22 September 2008

पाँडिचेरी भेट - भाग चार

तर यापुढचं अतिशय देखणं काम, एक दिव्य अनुभव म्हणजे ऑरोव्हिल city of dawn आणि मातृमंदिर hall for concentration.

ऑरोव्हिल हि एक उच्च आणि भव्य कल्पना a divine dream of mother. त्या कोण्या एका देशीच्या बाईने एक स्वप्न फारफार पूर्वी पाहिले अन आपल्या बकुळफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशी ते उभवण्याचा मानस बोलून दाखवला. पाँडिचेरीजवळ  -२००० एकरमध्ये - सरकारच्या मदतीनं हे बिनमुखवट्याचं एक international township - आकाराला येऊ लागलं. १२४ देशातले लोक आपापल्या देशाची माती घेऊन इथे एकत्र आले. आपण संकल्पाला मूठमाती देतो.

इथे मूठ मूठ माती संकल्पनेला रुजण्याचं बळ देत होती.

आमची माती आमची माणसं, जोडते मनाची नाती, आमची माती ...

या ओळीतला दडलेला अर्थ असाही असेल काय? पण यातून उभवलेला लाल रंगाचा दगड म्हणजे प्रतिकात्मक शिलाबांधणीचा समारंभ - फिल्ममध्ये पाहताना सर्वांगावर रोमांच आले - आणि तेही आपल्या या - या कडीकोंड्याच्या उशाखाली धोंड्याच्या भारतमातेवर! धन्य असोत त्या माताजी आणि ते श्री ऑरोबिंदो!

तर १९६८ साली मुहूर्तमेढ रोवली गेली.

इथे कोणीही येउन राहू शकतं - अट एकच वय / जाती / वर्ण / राष्ट्र सारं पायदळी तुडवून, तिलांजली देऊन unity in humanity चा स्वीकार करणं. तर या आकाशगंगेला आजूबाजूला green belt ने वेढलयं. ही ती झाडं - ती झुडपं - ते वृक्ष जे तो गोष्टीतला म्हातारा आपल्या नातवंडं / पंतवंडांसाठी लावतो. तीच आशा, तेच स्वप्नाळु डोळे असणारे आपले आजी-आजोबा म्हणजे माताजी आणि ऑरोबिंदो!

क्रमश:

सुप्रिया 

Tuesday 16 September 2008

पाँडिचेरी भेट - भाग तीन

२७ सप्टेंबर

आज पाँडिचेरीत दाखल झालो. आजीची भेट झाली. तिला मी भेटल्यावर मला कुठे ठेवू नी कुठे नको झालं. किती काय काय - हे इथे बघ, ते तिथे असं काहीबाही न थांबता बोलत राहिली. मी ते बघावं यासाठीची तिची तळमळ ओसंडत होती. तर प्रथम आश्रमात समाधीचंच दर्शन झालं. सुंदर, मनोविभोर फुलांच्या देखण्या ओळी, संगमरवरी समाधीवर सुंदर नक्षीकाम केलेले. तिथल्या अनामिक शांततेत स्वतःला साधारण २०-२५ मिनिटं हरवून टाकलं असेल मी. कालच पाहिलेल्या पुट्टपर्थीच्या समोर आजचा अनुभव ....  मनात नकळत तुलना होऊ लागली. कसा काय? तर काल तिथल्या भव्य मंदिरासमोरुन जाताना एक शब्द जरी तोंडातून काढला तरी 'साईराम! silence!' असे कानावर पडतं होते. या पार्श्वभूमीवर इथे मात्र कुणीही न सांगता बोलतं नव्हते. काहीही सांगायची गरजचं नव्हती. शांतता कशी ती आपोआपच रहात होती. या विरोधाभासाचं कारण काय असावं?

नंतर समुद्रकिनार्‍यावर नेहमीप्रमाणेच समुद्राचं सुरेख रुपडं बराचं वेळ डोळ्यात साठवलं नी परतलो.

इथे आल्याआल्या प्रथम जाणवली ती शांतता. मग कारणं उमजली - एकतर माताजी आणि ऑरोबिंदोंचे वास्तव्य आणि मग सायकलींचे वाढतं प्रमाण - म्हणून प्रदुषण खूप कमीये.

आज एका हॉटेल मध्ये गुजराती पध्दतीचे जेवण मिळाले. चार दिवस उपमम्, अन्नम, रस्सम, फिस्सम नी दमलेल्या जिभेला नी पोटालाही रुचकर दिलासा मिळाला.

२८ सप्टेंबर

आजची सकाळ फक्त पाँडिचेरीत फिरणं झालं. उन्हामुळे ओलेते कपडे नी खालीवर फिरवण्याच्या नादात सटकणारा स्कार्फ़! अशा आम्ही एका बेंगॉली रेस्तॉरॉमध्ये शिरलो. शोन्देश, चमचम, लवंगलतिका, लांगचा बघुनच जीभ रवरवायला लागली. पण एका  लांगचा मधेच गोडघाशाचा डोंगर ढासळला.

आश्रमाचं जेवण जेवणे हा प्रकार आमच्याकरता नवा!  सकाळचा नाष्टा व दोन जेवणं - अवघ्या २० रुपयांत!  सकाळी कूपन काढणे - तेच दिवसभर जपून वापरणे. तर मग दुपारच्या जेवणानं सुरुवात झाली. शिस्तीचा बडगा किंवा पुट्टपर्थीतल्या सारखा "silence!" म्हणून आरडाओरडा नसतानाही लोक शांत रहात होते. तर आता रांगेने जाणे. प्रचंड मोठे वाडगे भरभरुन पण हवे तेवढेच वाढप - त्यामध्ये होते गोड / साधे दही, सर्व भाज्यांची 'अम्मा' भाजी, भात, खीर आणि ब्राऊन ब्रेड. जेवणानंतर बाबांचा चेहरा बघण्यासारखा. मला विनोबांच्या आश्रमातील जेवणापुढे हे जेवण पक्वान्न वाटले आणि म्हणून की काय - आवडले. नंतरही त्यांची ताटे - वाट्या धुण्याची पध्दत पाहण्याजोगी - व्यवस्थित स्वच्छता / शिस्त जास्त काही न बोलता - वाटलं की, इथे foreigner जास्त असल्यानं म्हणजे स्वयंसेवक म्हणून बरं का ! - कदाचित असा नम्रपणा असेल काय? कारण आजवर इथे जे जे युरोपियन्स भेटले ते कमालीचे नम्र, शिस्तप्रिय व गोष्टी अत्यंत प्रेमाने समजावणारे. हे त्यांच्याकडून उचलण्याएवजी, त्यांच्या संस्कृतीतला कचरा भाग घेणं, आपण लोक कधी सोडणार ??

क्रमशः

सुप्रिया

Tuesday 9 September 2008

पाँडीचेरी भेट - भाग दोन - पुट्टपर्थी

आता आम्ही आलो आहोत पुट्टपर्थी मध्ये. शिर्डी सत्यसाईबाबा - त्यांचा हा अवतार - पुट्टपर्थीचे साईबाबा! त्यांची तत्त्वे, त्यांचे विचार मला फारसे माहीत नसल्यानं म्हणा किंवा पूर्वग्रह म्हणा पण मला या वातावरणाशी समरस व्हायला अंमळ वेळ जावा लागला. पण एक माणूस काय काय करु शकतो, गोष्टी कशा सुनियोजित असतात, शिस्तबध्दता कशी असते या गोष्टी इथे जाणवल्या. इथे शिरल्यापासुनच आपण 'हरि ओम' म्हणतो तसे 'साई राम' कानावर पडू लागले. बाबांचे ३.३०-४.०० च्या सुमारास लांबूनच शिस्तबध्द दर्शन घेतले. त्यांच्या ट्रस्टने हाती घेतलेल्या उपक्रमांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षण higher learning education इतकेच नव्हे तर एक म्युझिक कॉलेज पण आहे. इवल्या इवल्या वाटणार्‍या या गावात विमानतळही आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व शिक्षण पूर्णतया मोफत आहे. तसंच इथल्या शॉपिंग सेंटर किंवा market / bookstall मध्ये प्रचंड reasonable rates आहेत. तत्त्व एकच ना नफा ना तोटा! शिवाय इथे ज्या खोल्या दिल्या जातात, तिथे तर कमालीचा रास्त भाव आकारला जातो. सेवा दल समिती मध्ये आपण स्वयंसेवक म्हणून काम करु शकतो. विश्वास बसेल न बसेल पण इथे रोजचे ६०० - ७०० लोक त्याकरता आपलं सर्वस्व विसरुन राबतात. प्रत्येक राज्यातल्या लोकांची ठराविक महिन्यात ड्युटी असते. यातून सर्वधर्मसमभाव किती सोप्या पध्दतीने साधला जातो! आणि कोणाही परदेशी माणसाशी काही छोटंमोठं बोलायचं असेल तर 'साईराम' चा घोष आहेच!

पण इथली एक जाणवणारी गोष्ट म्हणजे प्रत्येकच बाबतीत पुरुष व स्त्री साठी निरनिराळी दालने, निरनिराळे विभाग इतकंच नव्हे तर शॉपिंग मॉल मध्ये दोघांसाठी निरनिराळ्या वेळादेखील. co-education ची संकल्पना साईबाबांना मान्य नसल्याने हे सारे सव्यापसव्य! पण एका व्यक्तीच्या उभ्या आयुष्यात तिच्याकरवी लाखो माणसांनी एकत्रित संघटित होणं आणि वेगवेगळे प्रकल्प तडीस नेणं हीच मनुष्यत्वाची प्रचिती! किंबहुना हेच मनुष्यातल्या श्रेष्ठत्वाचं अनुभुतीत उतरणं!