Monday 2 August 2010

लंडन डायरी भाग ३ : २६२ , वॉल्टन रोड , वोकिन्ग वरून - लंडन लाईफ सुरू झालं तेव्हा ..

### नवर्याच्या सामानात हे एवढे टिन फूड आणि मॅगी किंवा तत्सम सिरिअल्सची पाकिटे पाहूनच मला धसकायला झालं ! "मी नाही असलं खाणार डब्यातलं पॅकबंद खाणं! " मी जाहीर करून टाकलं .. लगोलग नवर्याचे उत्तर आले "मग बनव स्वतःच ! " मनात म्हणलं "ते परवडलं ! असलं डब्यातलं खाण्यापेक्षा स्वतः बनवलेलं - कसं का असेना (!) पण चांगलं लागेल.." झालं ! दुसर्याच दिवशी आम्ही इथल्या जवळच्याच स्टोअरमधून थोडे किराणा मालाचे सामान आणले..वस्तुन्च्या किमतींचे रूपयात कन्वर्जन नाही करायचे असे आम्ही दोघेही सतत एक्मेकाना आणि मनाशी बजावत होतो .. पण कळत नकळत ते होऊन जायचे आणि "काय हे ! ही वस्तू तर अमूक अमूक इतकी स्वस्त मिळते नै आपल्याकडे! " असे उद्गार आमच्या ओठांवर यायचे आणि हसायला यायचं - नाईलाजाने! काय करणार ? पापी पेटका सवाल इत्यादि इत्यादि था! भाज्या आपल्याकडच्या भाज्यान्सारख्याच फक्त जरा घट्ट सालीच्या आणि ताज्या ... पाकिस्तानी / इराणी माणसाचं स्टोअर असावं॥ इथे Atif म्हणून एक दुकानांची चेन आहे .. मला आपली सारखी आपल्या कळकट मार्केट यार्ड ची आठवण यायला लागलेली .. कितीही स्वच्छता ठेवा ... कितीही प्रशस्त मांडामांड करा दुकानाची ... पण ते मग्रूर भाव चेहर्यावर खेळवत "वैनी अवो आमाला तरी परवडायला पायजे का नको?" असे तालात म्हणत मस्तपैकी भाजीच्या ढिगार्याआड मांड ठोकून बसलेल्या पुणेकर भाजीवाल्याकडून घासाघीस करत , आपला आत्मा एका विशिष्ट बार्गेनिंग वॅल्यूवर न तळमळता स्थिरावत , दोन्ही हातांत भाजीच्या पिशव्यांचा डिस्को डान्स करत मनावर ताबा ठेवत सुट्टे पैसे त्या भाजीवाल्याला देऊन जी काही भाजी आपल्या ताब्यात येते तिला पाहूनच जीव कसा धन्य होऊन जातो ! वर भाव केल्याचं एक मन भरून असलेलं समाधान! :) पण एनिवेज .. इथे प्लॅस्टिक कंटेनर्स , टिश्यू पेपर्स , टिन्सचा वापर खूप दिसतो आहे असे नवर्याला म्हणले तर तो म्हणाला "हो वापर भरपूर आहे पण इथली प्रत्येक गोष्ट रिसायकल होते हे आहे का ठाऊक ? "

### स्वयंपाकघरात शिरले ..छान आहे हे स्वयंपाकघर...प्रशस्त आणि आमने सामने ओटे असणारं .. ही फ्याशन सध्या आपल्याकडे देखील रूजू घातली आहे .. गॅस आपल्यासारखाच आहे .. नवर्याचा कुणी एक मित्र आणि त्याची बायको आधी वर्षभर इथे राहात होते म्हणे ..तर ती कनवाळू माऊली माझ्याकरता काही सामान आणि भांडी मागे ठेऊन गेली होती .. (नंतर समजलं कप्पाळाची कनवाळू! त्यांचं म्हणे सामानच खूप जास्त झालेलं इथनं निघताना ... सो काही भांडी व सामान ठेवावेच लागले .. :)जाउदे ... भांडी मिळाली वापराकरता हेही नसे थोडके ! कारण इथे मुख्य अडचण डब्यांची झाली .. आई आणि सासूबाईंची आठवण ठायी ठायी ठाण मांडायला लागली .. त्या दोघी हॉटेलमधले प्लॅस्टिकचे डबे कसे रियूज करतात याची .. इथे दूध पिशवीतून नव्हे तर प्लॅस्टिक कॅन मधून येतं .. म्हणलं चला .. आता असे कॅन साठवून वापरता येतील ... आणि हो , सिंकमध्ये दोन नळ आहेत .. एक २४ तास गरम म्हणजे बॉइलरमधून येणार्या गर्मागरम पाण्याचा आणि दुसरा गार म्हणजे मस्तकात ति़डीक जाईल इतक्या बर्फाळ गार पाण्याचा .. नेहेमी हात धुताना / भांडी घासताना (हो ना आपली भांडी आपणच घासायची .. कामवालीचं सुख इथे नाहीच ना नशिबात ! )ही पाण्याची अ‍ॅड्जस्ट्मेण्ट करायचे सतत भान ठेवावे लागायचे .. स्वयंपाकघराच्या मागे पोर्च आहे .. मस्त हिरवळ आणि त्यात दोन दोनच्या ओळीत टाकलेल्या फरश्या! पण .. हा पणच जिथे तिथे आडवा येतो ना .. हाय कम्बख्त! दिवस उजाडतो तोच ७ नंतर आणि मावळतो ३.४५ ला .. शिवाय अत्यंत कमी तापमान , अधनंमधनं वाहणारे गार वारे आणि भरीला भर म्हणजे कधीही येणारा पिरपिरा पाऊस! कुणीसं म्हंटलेलं एक फेमस वाक्य आहे ना "If you do not like London's weather then wait for10 minutes .. It will change! " असो . तर स्वयंपाकघरात माइक्रोवेव्ह पण आहे ... फक्त मिक्सर नाही . .. मनातल्या मनात मशिन्समुळे आलेल्या परावलंबित्वाची जाणीव होऊन चडफडत स्वयंपाक सुरू केला .. नवर्याच्या यू.के. मध्ये रहात असलेल्या बहिणीने - मोनालीने कुकर , पोळपाट-लाटणं देऊन फार सुकर केलं आमचं स्वयंपाकाचं आयुष्य!

क्रमशः




लंडन डायरी भाग : २६२ , वॉल्टन रोड , वोकिन्ग वरून - डिसेम्बर २००९ आणि नंतर

"विमान पुढच्या २० मिनिटांमध्ये हिथरो एअरपोर्टवर लॅण्ड होते आहे.सध्या बाहेरचे तापमान आहे डिग्रीज सेल्सिअस" पहिल्या सूचनेपेक्षाही धक्कादायक होती ती दुसरी माहिती ! विमान थांबल्या थांबल्या (खरंतर थांबता थांबता म्हणणं जास्त योग्य ठरेल) सगळ्या प्रवाशांनी केबिन लगेजमधून तमाम गरम कपडे बाहेर काढून ते अगदी सराईताप्रमाणे अंगावर चढवायला सुरुवात केली देखील .. मी सुध्दा स्वेटर , कानटोपी , मफलर , . जय्यत सगळं काढलं आणि लंडनमध्ये एकदाचा पाय ठेवला मात्र ... पुढची महत्त्वाची मोहीम होती ती आधी आपली बॅग - नाडीवाली , हो ते सांगायचंच राहिलं सगळेजण आपल्या बॅगांना लेसेस , रिबिनी बांधतात म्हणून मी मुद्दाम नाडी बांधली होती :) वेगळेपणा दाखवायला - पुण्याचे आहोत ना शेवटी ;) तर ती बॅग आणि मग नवरा शोधून काढणं .. सुदैवानी दोन्हीही लगेच मिळाले :) बॅग सापडली आणि लगोलग एक्झिटकडे धाव घेतली तो नवरोबा तिथे उभे होते बिच्चारे! अर्ध्या तासापासून ... आम्हाला आता टर्मिनल पासून टर्मिनल पर्यंत ट्रेनने जायचं होतं .. आणि पुढे इच्छित ठिकाणी बसने.टर्मिनल वर पोचून बसचं तिकीट काढायला बाहेर पडलो आणि जस्ट चिल चिल! नाही गाणं नाही - सर्वांगाची अशी अवस्था झाली , नवर्याला म्हंटलं - अरे डिग्रीजला अशी गत होते आहे तर मग त्याहून खाली तापमान गेल्यावर पुढे काय व्हायचं ? यावर निर्विकार नवरेजात थंडपणानं माझ्याकडे पहाता नवरा उदगारला - "शून्य डिग्रीज आहे सध्या तापमान!" मी आणखीच गारठले - उभ्या जागीच .. एकूणात टूरिस्ट लोकांसाठी तद्दन नालायक "शीजन"मध्ये मी लंडनमध्ये येऊ घातले होते हे ध्यानात येऊ लागलं होतं - अर्थात पुढेही ते निरनिराळ्या पध्द्तीनी समजणारच होतं - पण त्याचा ट्रेलर हा असा होता .. फारसा आशादायी नसलेला- म्हणजे थंडीच्या बाबतीत - थंडी कसली - थंडाई होती ती! पुढे बसने घरी जाताना तिथले रस्ते , तिथले सिग्नल्स आणि एकदाही वाजलेला एकाही वाहनाचा हॉर्न आणि आपले रस्ते , आपलं ट्रॅफिक आणि आपल्या इमारती यांची सतत तुलना होत होती - मनोमन!टॅक्सीने घरी आलो.घर छोटेखानी पण सुबक होतं . ओनर कुणीतरी पकिस्तानी होता आणि तो सध्या छुट्टिया मनाने के लिए घरी गेला होता म्हणे.खाली ड्रॉइंग रूम आणि किचन , वर दोन डबल रूम्स अधिक एक सिन्गल रूम होत्या.आणि त्याच्याही वरच्या मजल्यावर तो ओनर रहायचा. नवरा इतके दिवस सिन्गल रूममध्ये राह्त होता.आता मी आल्यावर आम्ही सर्व सामान डबल रूममध्ये शिफ्ट करायला सुरुवात केली.उरलेली डबल रूम पहायला एक साऊथ इन्डिअन मुलगी आली होती.आम्ही सगळ्यानीच त्या मजल्यावरचे लाईट्स ऑन केले आणि एका मिनिटातच पॉवर ऑफ! आमचं धाबंच दणाणलं!नवा देश,नवे लोक एकतर सगळंच अनोळखी आणि त्यातून ओनर पाकिस्तानी शिवाय तो तिथे नाही ..आता काय करायचं तरी काय ? सवयीनं तोंडून निघून गेलं "अरे , कोपर्यावरच्या दुकानातल्या इलेक्ट्रिशिअनला बोलवायचं का ? " पुन्हा तोच तो नवरेजात थंडपणा आदळला अंगावर "अग बये हे पुणं नाही यू के आहे यू के! "थोड्या वेळाने सहजच विचार आला डोक्यात 'कट आउट तर नसेल ना पडला ? ' नवर्याला बोलून दाखवल्या दाखवल्या तो खाली गेला - switches and wiring चे नेटवर्क पहायला .. कट आउटच पडला होता .. नशिब! वाईट उपमा आहे पण त्या क्षणी खरंच सांगते जिवावर बेतलं पण बोटावर निभावलेल्या शायिस्तेखानाचे भाव मनी अवतीर्ण झाले नसले तरच नवल! थिअरी ऑफ रेलेटेविटी नी म्हणा किंवा काही म्हणा पण साधासाच प्रॉब्लेम किती मोठा वाटला होता काहीवेळासाठी!

क्रमशः



Thursday 29 July 2010

लंडन डायरी भाग १ : १ डिसेंबर हा प्रयाणाचा दिवस ठरला . तर त्याच्या आधी ..

मला स्वप्नातही कधी असं वाटलं नव्हतं की २००९ चा डिसेंबर महिना माझ्यासाठी इतका सनसनीखेज असेल .. एकतर परदेशगमनयोग आणि एकटीने केलेला विमानप्रवास ! उण्यापुर्या साडेपाच वर्षांच्या आय टी सर्विसमध्ये जे माझं कधीकाळी ध्येय नंतर स्वप्न आणि सरतेशेवटी "वो भूली दास्तान" बनलं त्याची पूर्ती ही अशी व्हायची होती .. अर्थात सारं श्रेय माझ्या नवर्यालाच दिलं पहिजे .. त्याच्यामुळेच तर हा परदेशप्रवास फुकटात (खरंतर फुकटात कसला "लग्न नसतं झालं तर कित्ती बर्रर्र झालं अस्तं नै !" असं माझ्या नवर्याला हजारदा वाटावं इतका महागाचा होता हा प्रवास ;) एनिवेज ..) पदरात पडला होता ना ..

मनातनं आधी थोडी धाकधूक नव्हे आता खोटं कशाला बोलू ? पोटात चांगलं बाकबूक होत होतं .. फक्त नवरा सोडला तर कोणासमोर ते बोलून दाखवायची प्राज्ञा नव्हती म्हणजे उगीच असं वाटत होतं की सगळे काय म्हणतील काय येवढी मोठी झाली आणि एवढ्याश्या गोष्टीला घाबरते .. आणि म्हणायला त्यांचं काय जाणार होतं म्हणा .. प्रवास मलाच करायचा होता ना ... एकटीला... "ए क टी"ला !!! पण खरंच हा विमानप्रवास (तोही दहा तास फक्त )ही काय "एवढीश्शी" गोष्ट होती? माझ्याकरता तरी नक्कीच नव्हती...मला आठवतंय त्याप्रमाणे मागे आम्ही हनीमूनसाठी जेव्हा ठिकाण ठरवत होतो तेव्हा लक्षद्वीपचं नाव निघाल्यावर मी म्हंटलं होतं "अय्या! पण पासपोर्ट कुठाय माझा?" तेव्हाचा नवर्यानी दिलेला "केस विंचरायची अक्कल नाही आणि रोज ऑफिसात कशी जाते कुणास ठाऊक " टाइप्स लूक पाहूनच चूक लक्षात आली होती .. :) असो. तर विमानात न्यायच्या सामानात काय न्यायचं नी काय काय नेलेलं चालत नाही त्याची लोकानी ही भली मोठ्ठाली जंत्री दिली होती .. तरी बरं या लोकांपैकी अर्ध्या अधिक लोकांनी विमानप्रवास मुळी केलेलाच नव्हता यापूर्वी ;) आणि असे लोक आघाडीवर होते बरं अमूल्य सल्ले विनामूल्य देण्यात .. शिवाय ह्या ढीगभर सूचना आणि या याद्या पाहूनच मी हादरले होते .. पण वरकरणी शांत होते .. नवर्याला बर्याच दिवसांनी भेटणार म्हणून उत्सुकता होती मनाशी कुठेतरी त़ळाशी पण वरती मात्र ही विमानप्रवासाची भीती ठाण माण्डून बसली होती. अखेर तमाम सर्व सूचनांसमोर शरणागत होत्साती मी एकदाची एअरपोर्टवर "लॅण्ड" झाले! त्या तिथे माझं ध्यान कसं होतं म्हणून सांगू? कसे वर्णू ? मोठ्ठी ट्रॉली ॥!(हो ती पुढे ढकलायची पण ट्रिक अस्ते बर्का! ती तिथे न जाणार्यांना नकळे !) ,गळ्यात अडकवलेली पासपोर्टची "छोटीशी" चामड्याची पिशवी - ज्यात पासपोर्ट आहे हे समस्तजनांनी इतक्यांदा माझ्याकडनं घोकून घेतलेलं होतं की मध्येच एक्दा त्यात माझं स्वतःचं पैशांचं पाकिट पाहून मीच बावचळले होते ! - तर असो! ही पिशवी , एक १८.७ किलोची मोठी बॅग (ज्याला चेक-इन म्हणतात असे नव्यानेच कळलेले!) आणि पाठीवर ३.६ किलोचं केबिन लगेज (ही देखील ज्ञानात पडलेली भर!) ! अशा अवतारात मी आत शिरले। सगळे सिक्युरिटी सोपस्कार पार पडले नी ड्यूटी फ्री एरीआमध्ये जाऊन मी "जितं मया" मोडमध्ये खुर्चीवर विराजमान झाले ! आणि हो बरोब्बर माझ्या विमानाच्या पाटीसमोरच्या खुर्चीवर बरं ! प्रवासाची वेळ झाली - आम्ही विमानात शिरलो ... (तुकाराम महाराजांची क्षमा मागून ) तुकारामांनी वैकुन्ठासाठी पुष्पक विमानात प्रवेश केल्यावरचे कृतकृत्यतेचे भाव माझ्या चेहर्यावर विराज(वि)मान झाले ! मनातल्या मनात माझा हात शाबास्कीसाठी माझ्या पाठीवरनं फिरण्यासाठी शिवशिवू लागला तोच ..११.५३ ला १ डिसेम्बर २००९ ला तो ऐतिहासिक क्षण माझ्या आयुष्यात येण्यासाठी आतुर झाला ...भारत सोडायचा ...

भलेही विमानप्रवास हे अप्रूप नसेल , कित्येक मुली एकेकट्या विमानप्रवास अगदी सराईतपणे करत असतील , भलेही विमानप्रवासाच्या नवलाईचे नवेपण ओसरले असेल पण खरं सांगते तो दिवस , ती वेळ , तो क्षण , तो थरार , ती उत्कंठा आणि तो आनंद माझ्याकरता खरंच नवखा आणि पूर्णपणे ऐतिहासिक होता ... अगदी रोमांचानं शिगोशीग भरलेला होता !

क्रमश:




Thursday 1 July 2010

आज खूप दिवसानी इथे आले आहे ...
आता पुन्हा मस्त मस्त पोस्ट्स टाकीन .. सर्वात आधी माझी लंडन ची डायरी टाकीन :)
तोवर ही आवडलेली कविता ...

सोपे शब्द ... स्पर्शून जाणार्या प्रतिमा आणि .. "सांगितले मी : तू हट्टी पण.." ही ओळ तर क्लास ...


पत्र लिही पण...

पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे....
लिपिरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू साजरे

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतून..
नको पाठवू तीळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूंतून

नको पाठवू अक्षरांतुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन...
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी : तू हट्टी पण..

पाठविसी ते सगळे मिळते
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्रच पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते !!!

- शान्ताबाई की (इन्दिरा संत ??)