Monday 5 January 2009

ऑनसाईट अपॉर्च्युनिटी ..

दहा माणशी एक आज आय.टी.त असतो. पैशाच्या नव्हे तर रूपयांच्या पायघड्या असणारं आणि म्हणूनच भुरळ पाडणारं हे क्षेत्र .. पण त्याबरोबरच नवरा आणि बायको जर आय.टी. मध्ये असतील तर अनियमित वेळा , विस्कटलेली जीवनपध्दती आणि त्यामुळे ताणतणावांचे अद्रुश्य विळखे असणारं सुध्दा..एरवी माणसाला फॉरेनची ट्रीप म्हंटलं की भूल पडते वरकरणी दिसतो तो भरपूर पैसा,ऐषोराम आणि त्यात हे सारं कंपनीच्या पैशातून ... पण आय.टी.तला हा onsite opportunity चा चक्रव्यूह भेदणं किती कठीण असतं हे त्यात अडकलेला एखादा अभिमन्यूच जाणे!!
ही गोष्ट आहे एका आय.टी. तल्या जोडप्याची .. सहानुभूति नव्हे पण क्वचित कुणाला अनुभूतिपर झाली तरी बरंच मिळवलं .. !!
---------------------------------------------------------------
'त्या' ची डायरी -
हल्ली मीही डायरी लिहायचं ठरवलं आहे .. जाई लिहीते तशी.. आश्चर्य आहे नाही ? लग्न होऊन अवघा एक महिना उलटतो ना उलटतो तोच सवयी लागायल्या लागल्या एकमेकांच्या ..आज इतका हेक्टिक गेला म्हणून सांगतो दिवस .. एकतर रिलिज जवळ आलाये प्रोजेक्ट चा - हे एवढं काम पेन्डिंग आहे आणि शिवाय हे ऑनसाईट कॉल्स्!श्या .. गंमतच वाटते मला कधीकधी .. आमचा दिवस संपतो तेव्हा यांचा उगवतो. हे म्हणजे थोडक्यात असं झालं की - पूर्वी आपण 'कायदे से' परकीयांच्या गुलामगिरीत होतो आणि आता नाईलाजानं म्हणा किंवा 'फायदे से' आपण पुन्हा त्यांच्याच गुलामगिरीत .. छान क्लाएण्ट च्या कह्यात आपण .. मी 'ऑनसाईट' शब्द ऐकला आणि चमकलोच ..टीम लीड सांगत होता - एका अनुभवी जागेसाठीची ही onsite opportunity!त्याचा होरा आज ना उद्या माझ्याकडे वळणार आहे यात शंकाच नाही ..बघूयात पुढचं पुढे ..आज फायनल आहे फुटबॉलची .. विसरलोच ही डायरी आणि ऑफिसच्या नादात ..चला ..

'त्या' ची डायरी -
आज ऑफिसातून बाहेर पडल्या पडल्या केवढा उत्साहात होतो मी .. आणि त्याच उत्साहात हिला फोन लावला..तर चिडली की कट केला तीच जाणे .. एकतर ऑनसाईट जायचं या कल्पनेनीच एक्साईट झालो आहे मी .. केवढे फायदे आहेत या एक दीड महिन्यांमध्ये हातात शिवाय बायोडेटामधली ही value addition !! कोणी कशाला हातची जाऊ देईल ? तर हिचं आपलं वेगळंच .. म्हणे आत्ताशी कुठे लग्नाला एकच महिना झाला आहे .. अरे लग्न काय कुणाची होत नाहीत की काय्?आणि आख्खं आयुष्य पडलं आहे ना पुढे एकमेकांना समजून घ्यायला.. practical व्हा म्हणावं थोडं..

'ती'ची डायरी -
हल्ली लिहावीशीच नाही वाटत डायरी .. पण अभिच ऑनसाईट जाण्यापूर्वी बजावून गेलाये लिही म्हणून काहीतरी खरडते आहे झालं..खरंतर अभि माझ्याजवळ नाही आहे , तो ऑनसाईट गेला आहे यावर विश्वास ठेवणंच कठीण जातं कधी कधी मला..
खरंतर यापूर्वी अशा काही कमी केसेस नाहीयेत पाहिलेल्या मी ..सांगताना सांगतील एखादा महिना आणि इकडे व्हिसा आपला होतो आहे ३-३ महिने एक्स्टेण्ड .. एखाद्याकडे असं त्रयस्थ भावनेनं पहाणं वेगळं पण आत्ता .. लग्नानंतरच्या पहिल्या-दुसर्या महिन्यातच आपल्याच नवर्याची अशी 'परदेशस्थ असाईनमेण्ट' पहाताना आतून अगदी अस्वस्थ होते आहे मी!!

आमच्या पहाण्याच्या कार्यक्रमात काय बरं म्हणाला होता अभि ? हं ... आठवलं.."बायको आय.टी.फिल्ड मधलीच हवी आहे मला!कारण या व्यवसायामध्ये अगदी पाचवीला पूजलेली क्लाएण्ट प्रेशर्स , त्या डेड्लाईन्स आणि क्लाएण्ट कॉल्स हे समजून घेण्याची पूर्ण तयारी असेल मग तिची.. " तुला अगदी मोकळेपणाने सांगते अभि .. नव्हे कबूलच करते म्हण ना .. ते तुला त्या वेळेस दुजोरा देणं सोपं वाटलं पण आता जेव्हा परिस्थितीला प्रत्यक्ष भिडण्याची वेळ आली आहे तेव्हा फार कठीण जातं आहे रे..!!जिवाची अगदी उलाघाल होते आहे ..

मेल्स्,फोन,चॅट नी मेसेन्जर्स जणू एकाएकी साथीदार बनलेत माझ्या एकाकी आयुष्याचे!हा म्हणजे virtual nearness..!! हो virtual च पण reality नसलेला..

'त्या'ची डायरी-
'फ्लायबॅक' देताहेत साले!'मला परत जायचंय' असा आक्रोश केला तरी बधणार नाहीत हे मुर्दाड मनाचे लोक..यांना फक्त आणि फक्त त्यांच्या कामाशी मतलब..इथे त्यांच्या एम्प्लॉयीचं पर्सनल लाईफ गेलं चुलीत .. पण माणूस इमोशनली स्थिर नसेल तर कामात तरी लक्ष लागेल का त्याचं?? तिकडे जाई सुध्दा हवालदिल..कधी कधी मला तिला सांगावंसं वाटतं - की असं नुसतं दिलावर हवाला ठेवून थोडक्यात भावनांचे घोडे नाचवून कसं चालेल अग ??

आज संसार मग तो दोघांचा जरी म्हंटला तरी किती माया जमवावी लागते बाई..पैशाची चक्रव्याढ गणितं सुटतातच मुळी मेहनत आणि जोडीला थोड्याश्या adjustment वर .. तिला हे कधीच नाही पटायचं .. असो.. लग्नाआधी म्हणूनच तर स्पष्ट कल्पना दिली होती..आणि म्हणूनच सजगतेनं , डोळ्सपणानं आय.टी. फिल्ड मधली मुलगी केली ना! आता मला तरी कुठे कल्पना होती की नंतर लगेचच मला हे असं ऑनसाईट जावं लागेल अशी .. आणि खरं सांगायचं तर onsite allowance सुध्दा काही छोटी गोष्ट नाही आहे ना.. अचिव्हमेण्ट आहे ती..

नाही म्हणजे तसा काही वेळा मी सुध्दा होतो म्हणा भावविवश.. पण 'कुछ पाना है तो कुछ खोना भी है' .. इथे तसं 'बहोत कुछ' मिस करतो आहे मी !!

इथे तशा सगळ्या सोयींची जशी लयलूट आहे .. ऑफिस सुटले की अगदी एषोरामात पंचतारांकित हॉटेलवर येतो आम्ही.. हवं ते खा प्या .. चैन आहे .. पण आज मला जी.ए.कुलकर्णींची ती गोष्ट आठवते आहे राहून राहून .. सुखासीन , ऐषोऐष असणार्या राजवाड्यात दिवसभर हुंदडूनही बिम्मला , संध्याकाळी आईनी फडताळात ठेवलेल्या , जुनाट काचेच्या बरणीतल्या , रवाळ लोणच्याच्या फोडीची आठवण येते - आणि हरतर्हेची सुखं पायाशी लोळण घेणार्या त्या राजवाड्यात त्याला हवी तशी ती लोणच्याची फोड मात्र नसते !!

वॉव!जाई आत्ता अगदी इथं हवी होतीस ग तू!मला सुचलेली अशी भन्नाट उपमा वाचायला ! पण छे मी इमोशनल वगैरे होतोय की काय ! नो वेज! बाय दि वे , उद्याला $$$ इतका onsite allowance जमा होणार असल्याची गुड न्यूज द्यायला हवी जाईला!

'ती'ची डायरी-
अभिला जाऊन एक महिना - चुकलंच पावणेदोन महिने होताहेत .. दिवस तर जसे मुंगीच्या पावलाने जातायेत पुढे .. आमचाही प्रोजेक्ट तसा भरभराटीत जम बसवत चाललाय..कामं जोरात सुरू आहेत.. अगदी सॉलिड वेगात्!!अभि वर म्हणतो "बघ दोघेही बिझी आहोत.. Good in one way !! " आणि मी म्हणतेय - गुड कसलं - Its bad in many ways !!!

अरे , निदान लग्नानंतरचे दोन महिने तरी तू माझ्याजवळ असायला हवं होतंस ना .. मुली जास्त हळव्या आणि भावूक असतात असं कुणी म्हणो हवं तर .. पण या दोन महिन्यात अभि , I needed you desperately!! मेल्स नी फोन प्रत्यक्ष जवळिक साधण्यात कितीसा हातभार लावणार? तू म्हणतोस पैसा महत्वाचा - मान्यय अभि , पण आपल्या आयुष्यातले हे मौल्यवान क्षण , एकमेकांना जास्तीत जास्त जाणून घेण्याचा हा काळ .. तू माझ्या आणि मी तुझ्या सान्निध्यात घालवण्याचे हे क्षण - पैशाने भरून काढता येतील? तू ही ऑनसाईट अपॉर्चुनिटी टाळू शकला असतास ना? याचं उत्तर आहे तुझ्याकडे ?..
मागे पाहिलेला एक जुना पिक्चर आठवतो आहे -राजेन्द्र्कुमार आणि वैजयंतीमालाचा-नाव आठवत नाही पण प्रसंग आणि गाणं आपल्या सिच्युएशनला अगदी साजेसे आहेत - त्यातून तू काल $$$ इतका onsite allowance जमा झाल्याचं बोललास , खुशीत होतास - म्हणून बोलले नाही - पण हे वाच - तुझा तुलाच 'अर्थ' स्पर्शून जाईल -

नुकतंच लग्न झालेल्या पतीला त्याची पत्नी नोकरीवर सुध्दा जाऊ देत नाही आहे - ती त्याला म्हणते आहे..
येह मौसम और येह दूरी

मुझे पल पल आँख दिखाए

तेरी दो टकिये की नौकरी

मेरा लाखों का सावन जाए

आताच्या परिस्थितीत निराळ्याच अर्थानी का होईना पण हे गाणं किती जवळचं वाटतंय नाही,अभि?

'त्या' ची डायरी-
ही डायरी नसती ना तर या भयंकर वास्तव्यात माझं काय झालं असतं?हिच्याच आधारावर तगून आहे म्हणा ना .. त्यात ही जाई अशी मधून मधून कच खात असते .. अरे आज भांडभांड भांडलो आहे मी मीटिंगमध्ये .. का सांगू ? माझं सगळं काम मी हातावेगळं करून सुध्दा हे लोक मला जाऊ देत नाहीयेत.. उलट एक ब्रँड न्यू असाईनमेण्ट माझ्या गळ्यात पडते आहे .. साल्यांना शेवटी मी म्हंटलं - माझा फॅमिली प्रॉब्लेम आहे - आता तरी जाऊद्या .. तर म्हणे उद्या निर्णय कळेल तुला.. visa extension / return ticket याचा ..

थोडी थांब ग जाई , मी येतोच आहे .. हा onsite allowance गेला खड्ड्यात .. मला आपली माणसं बघायची आहेत ग .. सगळ्यांशी खूप खूप बोलायचं आहे ..
pray for me Jaai ...please .. I am missing you desperately ..

'ती'ची डायरी-

आत्ता अभिचा फोन होता - तो येतो आहे - शेवटी झालं एकदाचं फायनल! - किती आनंदात होता! दोन दिवसांत निघत आहे म्हणाला..आत्तापर्यंत तर जवळजवळ १/४ allowance फोन मध्येच गेला असेल याचा..

अभि , अरे मला केव्हाचं काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी .. पण .. पण तुझ्या फोनवरच्या उत्साहावर विरजण पडलं असतं ..

ज्या ऑनसाईट असाईनमेण्टला इतकी नावं ठेवते मी , त्या म्रुगजळात मला स्वतःलाच जावं लागणारे - अरे २ महिन्यांसाठी $$$ ठिकाणी जाणार्यांमध्ये माझी निवड झाली आहे .. अरे मी खूप प्रयत्न केले नाही जाणार म्हणून .. अगदी निकराचा पर्याय म्हणून माझा राजीनामा आदळला त्या मॅनेजरच्या टेबलावर .. तर हसत म्हणतो "तुला जावंच लागेल जाई कारण आपल्या कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे नोटिस पीरिअड २ महिनेच आहे .. तेवढया काळात ती असाइन्मेण्ट पूर्ण होईल .. "

उद्याच visa stamping होईल अभि .. आता नाही टाळू शकत मी माझं जाणं .. प्रश्न एकच आहे - तुला कुठल्या तोंडानं हे सांगु ? सांग ना .. अभि मी काय करू ??.......

समाप्त .

6 comments:

  1. संगणक अभियंत्याचा खूप संवेदनशील विषयाला हात लावला आहेस मित्रा.
    पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा !!!

    -अभी

    ReplyDelete
  2. thanks abhi .. pan mee mitr nahi re maitrin aahe ..
    this is priya .. ..

    ReplyDelete
  3. Ekade yetAnA pratyekjaN far utAwiL asato, paN thodya diwasAtach eethalyA kharya paristhitichi jANiw hote...tyaweLi ghari jaaw as waatat paN ushir jhalelA asato...

    Onsite to Sone ka Pijara hai...Priya Good work...looking forward for ur next writeup on this....

    ReplyDelete
  4. Ekdam chhan lihila aahe.. Agdi barobar.
    He mrugjal aahe.. :)
    Lavkarach hi katha mazya aayushyat ghadnar aahe :)

    ReplyDelete
  5. Thats a very nice blog.This story is not only about "Jai" and "Abhi" but everybody who works in IT field.Some years back i was desparate to some to this IT because of money, onsite, fast progress, flat etc etc. But life has turned like anything and after spending 6 years in IT i feel that i have got everything what i have expected but lost happiness, peace, sleep and dreams. Looking forward your next blog about this IT mental disturbance.

    ReplyDelete
  6. sundar...
    Lihit raha asheech....

    Thambu nakos.

    - asunjay awate

    ReplyDelete