Thursday 17 July 2008

पाँडीचेरी भेट - विदुषी आजी

ऑक्टोबर २००३ चा महिना माझ्यासाठी खूपच संस्मरणीय ठरला. माझी आजी ही पाँडीचेरीच्या श्री ओरोबिंदो आश्रमाची अनुयायी आहे ... केवळ तिने आग्रह धरला म्हणून मी पाँडीचेरीला गेले. प्रथम पुट्टपर्थी आणि नंतर मजल दरमजल करत पाँडीचेरीचा प्रवास ...
त्या ७-८ दिवसात मी जे काही पाहिलं आणि अनुभवलं ते खरोखरं अभुतपूर्वच होतं त्या प्रवासाची यादगार रोजनिशी इथे लिहीते आहे. पूर्ण प्रवासाचे प्रेरणास्थान असलेल्या माझ्या आजीबद्दल थोडेसे आधी लिहीते आहे अन मग प्रवासाला सुरुवात करते ...

जायचं जायचं म्हणत प्रचंड इच्छाशक्तीनं किंबहुना फक्त त्याच बळावर आजी पाँडीचेरीला पोचली देखील. कळत असल्यापासून कळत नकळत का असेना पण आजीच्या अतिशय उमद्या मनाचा आणि आमच्या भाषेत एकदम 'सॉलीड' इच्छाशक्तीचा प्रत्यय मी घेतेय. 'आम्ही काय पिकली पानं! कधी गळून पडू नेम नाही' किंवा 'आता तुमचं ते अमकंतमकं झालं नं की मी वर जायला मोकळी' अशी फक्त आपलं स्वत:चच नव्हे तर दुसरर्‍याचंही मानसिक खच्चीकरण करणारी भाषा आजीच्या तोंडून मी कधीही एकल्याचं स्मरत नाही. उलट 'हे नाहीये ... आता माझं सगळं संपलंच' अशी निर्वाणीची भाषा बोलणार्‍या आम्हा तरूण मनांना तिचे शब्द उभारी देतात. कोट्याधीश नसले तरी गडगंज संपत्ती असणार्‍या शारंगपाणींकडची ही मुलगी. इनामदार घराणं मोठं श्रीमंत. आणि त्याही काळात मुलगा / मुलगीमध्ये शिक्षणाच्या अंगानं बिलकुल भेदभाव नसणारं. लहानपणीच आईचा वियोग झालेला असल्यानं आजी मनानं काहीशी प्रौढ बनत गेली. त्यातून दोन बहिणींतली मोठी मुलगी असल्यानं जबाबदारींच भान येणं, पुढे सावत्र आईचा जाच सहन करावा लागणं, नी धाकट्या बहिणीसाठी स्वतःची सुखं, स्वतःच्या भावना दडपणं हे ओघानं होत गेले.

पण वडिलांनी पहिली लेक आणि त्यातून आज्ञाधारकतेचं लेणं ल्यालेली म्हणून खूप शिकवलं नव्हे सारं काही स्वतःच जे शिकणं बाकी होतं, ज्या सुप्त इच्छा होत्या त्या पुर्‍या करून घेतल्या. बडोद्यात जन्मल्यानं गुजराथी बोलीभाषेशी संबंध आला. महाराष्ट्रीयन घरातलं शुध्द सरळसोट कोकणस्थी वळणाचं मराठी, वडिलांच्या आग्रहयुक्त सक्तीखातर पूर्ण दहावीपर्यंतचा बंगालीचा अभ्यास एक दीड वर्षात संपवल्यानं बंगालीतलं नैपुण्य आणि त्याही काळात एम.ए. पर्यंत संस्कृतमध्ये शिकल्यानं येणारं संस्कृत, शिवायं बी.ए. पर्यंत वाघिणीचं दूध प्यालेलं. म्हणजे आजच्या घडीला या बाईचं मराठी, संस्कृत, इंग्रजी, बंगाली आणि गुजराथी कुशलं असणं नी अधूनमधून 'हिंदी तेवढं राहीलं' अशी चुटपुट व्यक्त करणं. काय म्हणावं या अजब, दुर्दम्य आणि मिश्र शिक्षण असणार्‍या विदुषीला ? आणि एक गमतीची बाब म्हणजे इतकी लेणी मिरवणार्‍या या आजीचं लग्न एका कानडी विठ्ठलाशी व्हावं हा एक गमतीचा योगायोग!
पुढे यथावकाश पाँडीचेरीच्या श्री माताजींचा संबंध येणं, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणं, त्यांच्याशी तद्रूप होण्याचा प्रयत्न असणं हे हिचं केवळ अलौकिक पूर्वसुकृत!

आज वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत आजी स्वयंपाकघरात सर्वांसाठी राबत असे. आईच्या वात्सल्यानं झटतं असे. पण मध्ये आलेल्या आजारपणानं तिचा हा मक्ता, तिची कर्मभूमी माझ्या आईच्या स्वाधीन केला, अन आजीनं किचनमधून V.R.S. घेतली, हो voluntary च कारण नाहीतर तिचे अव्याहतपणे काम सुरुंच राहीले असते ....

क्रमशः

प्रिया

1 comment:

  1. आजीवरचा लेख मी नंतर वाचला आणि मग लक्षात आलं.. की तो पाँडीचेरी भेटीचा पहिला भाग होता..

    खूपच छान..

    तुझ्या लिहिण्यात लेखिकेचे गुण दिसतात Albeit they are all terribly short.. you can make out.. नालेवरून घोड्याची कल्पना इथे नक्कीच येऊ शकते.

    बाबांवर लिहिलेला तुझा लेखही जबरदस्त आवडला. भरून आलं.. हे नातं खरोखरी खूप मौल्यवान असतं नाही?

    आणि तू "बापलेकी" हा स्मृतिसंग्रह वाचला असशीलच.. आणि नसल्यास अवश्य वाच.. किंबहुना तो पुन्हा पुन्हा वाचता येण्यासाठी मी तर माझ्या जवळच ठेवला आहे..

    Keep writing girl!

    ReplyDelete