Thursday 29 July 2010

लंडन डायरी भाग १ : १ डिसेंबर हा प्रयाणाचा दिवस ठरला . तर त्याच्या आधी ..

मला स्वप्नातही कधी असं वाटलं नव्हतं की २००९ चा डिसेंबर महिना माझ्यासाठी इतका सनसनीखेज असेल .. एकतर परदेशगमनयोग आणि एकटीने केलेला विमानप्रवास ! उण्यापुर्या साडेपाच वर्षांच्या आय टी सर्विसमध्ये जे माझं कधीकाळी ध्येय नंतर स्वप्न आणि सरतेशेवटी "वो भूली दास्तान" बनलं त्याची पूर्ती ही अशी व्हायची होती .. अर्थात सारं श्रेय माझ्या नवर्यालाच दिलं पहिजे .. त्याच्यामुळेच तर हा परदेशप्रवास फुकटात (खरंतर फुकटात कसला "लग्न नसतं झालं तर कित्ती बर्रर्र झालं अस्तं नै !" असं माझ्या नवर्याला हजारदा वाटावं इतका महागाचा होता हा प्रवास ;) एनिवेज ..) पदरात पडला होता ना ..

मनातनं आधी थोडी धाकधूक नव्हे आता खोटं कशाला बोलू ? पोटात चांगलं बाकबूक होत होतं .. फक्त नवरा सोडला तर कोणासमोर ते बोलून दाखवायची प्राज्ञा नव्हती म्हणजे उगीच असं वाटत होतं की सगळे काय म्हणतील काय येवढी मोठी झाली आणि एवढ्याश्या गोष्टीला घाबरते .. आणि म्हणायला त्यांचं काय जाणार होतं म्हणा .. प्रवास मलाच करायचा होता ना ... एकटीला... "ए क टी"ला !!! पण खरंच हा विमानप्रवास (तोही दहा तास फक्त )ही काय "एवढीश्शी" गोष्ट होती? माझ्याकरता तरी नक्कीच नव्हती...मला आठवतंय त्याप्रमाणे मागे आम्ही हनीमूनसाठी जेव्हा ठिकाण ठरवत होतो तेव्हा लक्षद्वीपचं नाव निघाल्यावर मी म्हंटलं होतं "अय्या! पण पासपोर्ट कुठाय माझा?" तेव्हाचा नवर्यानी दिलेला "केस विंचरायची अक्कल नाही आणि रोज ऑफिसात कशी जाते कुणास ठाऊक " टाइप्स लूक पाहूनच चूक लक्षात आली होती .. :) असो. तर विमानात न्यायच्या सामानात काय न्यायचं नी काय काय नेलेलं चालत नाही त्याची लोकानी ही भली मोठ्ठाली जंत्री दिली होती .. तरी बरं या लोकांपैकी अर्ध्या अधिक लोकांनी विमानप्रवास मुळी केलेलाच नव्हता यापूर्वी ;) आणि असे लोक आघाडीवर होते बरं अमूल्य सल्ले विनामूल्य देण्यात .. शिवाय ह्या ढीगभर सूचना आणि या याद्या पाहूनच मी हादरले होते .. पण वरकरणी शांत होते .. नवर्याला बर्याच दिवसांनी भेटणार म्हणून उत्सुकता होती मनाशी कुठेतरी त़ळाशी पण वरती मात्र ही विमानप्रवासाची भीती ठाण माण्डून बसली होती. अखेर तमाम सर्व सूचनांसमोर शरणागत होत्साती मी एकदाची एअरपोर्टवर "लॅण्ड" झाले! त्या तिथे माझं ध्यान कसं होतं म्हणून सांगू? कसे वर्णू ? मोठ्ठी ट्रॉली ॥!(हो ती पुढे ढकलायची पण ट्रिक अस्ते बर्का! ती तिथे न जाणार्यांना नकळे !) ,गळ्यात अडकवलेली पासपोर्टची "छोटीशी" चामड्याची पिशवी - ज्यात पासपोर्ट आहे हे समस्तजनांनी इतक्यांदा माझ्याकडनं घोकून घेतलेलं होतं की मध्येच एक्दा त्यात माझं स्वतःचं पैशांचं पाकिट पाहून मीच बावचळले होते ! - तर असो! ही पिशवी , एक १८.७ किलोची मोठी बॅग (ज्याला चेक-इन म्हणतात असे नव्यानेच कळलेले!) आणि पाठीवर ३.६ किलोचं केबिन लगेज (ही देखील ज्ञानात पडलेली भर!) ! अशा अवतारात मी आत शिरले। सगळे सिक्युरिटी सोपस्कार पार पडले नी ड्यूटी फ्री एरीआमध्ये जाऊन मी "जितं मया" मोडमध्ये खुर्चीवर विराजमान झाले ! आणि हो बरोब्बर माझ्या विमानाच्या पाटीसमोरच्या खुर्चीवर बरं ! प्रवासाची वेळ झाली - आम्ही विमानात शिरलो ... (तुकाराम महाराजांची क्षमा मागून ) तुकारामांनी वैकुन्ठासाठी पुष्पक विमानात प्रवेश केल्यावरचे कृतकृत्यतेचे भाव माझ्या चेहर्यावर विराज(वि)मान झाले ! मनातल्या मनात माझा हात शाबास्कीसाठी माझ्या पाठीवरनं फिरण्यासाठी शिवशिवू लागला तोच ..११.५३ ला १ डिसेम्बर २००९ ला तो ऐतिहासिक क्षण माझ्या आयुष्यात येण्यासाठी आतुर झाला ...भारत सोडायचा ...

भलेही विमानप्रवास हे अप्रूप नसेल , कित्येक मुली एकेकट्या विमानप्रवास अगदी सराईतपणे करत असतील , भलेही विमानप्रवासाच्या नवलाईचे नवेपण ओसरले असेल पण खरं सांगते तो दिवस , ती वेळ , तो क्षण , तो थरार , ती उत्कंठा आणि तो आनंद माझ्याकरता खरंच नवखा आणि पूर्णपणे ऐतिहासिक होता ... अगदी रोमांचानं शिगोशीग भरलेला होता !

क्रमश:




6 comments:

Deepak said...

छान.. आता पुढचा भाग लवकर येऊद्यात!

प्रिया said...

अरे वाह ... भुन्गा ! किती क्विक ! असा रिस्पॉन्स वाचला की एक्दम मस्त हुरूप येतो .. पोस्टतेच आहे पुढचे ...

हेरंब said...

मस्तच लिहिलंय.. आवडलं.. पुढचा भाग कधी?

Asha Joglekar said...

तुकारामांनी वैकुन्ठासाठी पुष्पक विमानात प्रवेश केल्यावरचे कृतकृत्यतेचे भाव माझ्या चेहर्यावर विराज(वि)मान झाले ! मनातल्या मनात माझा हात शाबास्कीसाठी माझ्या पाठीवरनं फिरण्यासाठी शिवशिवू लागला तोच ..११.५३ ला १ डिसेम्बर २००९ ला तो ऐतिहासिक क्षण माझ्या आयुष्यात येण्यासाठी आतुर झाला ...भारत सोडायचा .
मस्त. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

प्रिया said...

धन्यवाद हेरम्ब आणि आशा.. शक्य तितक्या लवकर टाकत जाईन पुढचे भाग :)

Anonymous said...

Sahiiii Lihalayyy chan watale vachunn